लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: भाडेतत्वावर घेतलेल्या महागड्या मोटारीची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या नागपूरमधील चोरट्यांच्या टोळीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. पसार झालेल्या चोरट्यांना नागपूर, नाशिक, शिक्रापूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

रोहित संदीप दरेकर, आकाश रावसाहेब पोटघन उर्फ भडांगे ( दोघे रा. पुणे), गणेश रामलाल माळी, सौरभ विक्रम हावळे, मृणाल प्रकाश सोरदे, राकेश देवेंद्र पवार (सर्व रा. नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. याबाबत एका टुरिस्ट व्यावसायिकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. तक्रारदार टुरिस्ट व्यावसायिकाकडे १२ मे रोजी आरोपी दरेकर मोटार भाडेतत्वावर घेण्यासाठी आला होता. व्यावसायिकाने त्याच्याकडील आधार कार्ड, पॅन कार्ड पाहिले. त्यानंतर त्याला ९ दिवसांसाठी भाडेकरारावर मोटार दिली. नऊ दिवसानंतर दरेकर परतला नाही. संशय आल्याने टुरिस्ट व्यावसायिकाने दरेकरने दिलेल्या कागदपत्रांची शहानिशा केली. तेव्हा कागदपत्रे दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचे उघडकीस आले.

आणखी वाचा-पिंपरी- चिंचवडमधील अवैध वृक्षतोडी संदर्भात लढतोय हा पर्यावरण प्रेमी; उद्या मंत्रालयासमोर करणार उपोषण!

टुरिस्ट व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर विमानतळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी तांत्रिक तपास सुरू केला. आरोपी दरेकरला शिरुर येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने साथीदार आकाश, गणेश आणि सौरभ हावळे यांच्याशी संगनमत करुन मोटार चोरल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आरोपींना नाशिक आणि शिक्रापूर येथून ताब्यात घेण्यात आले. त्यावेळी आरोपी सौरभ हावळे याच्यामार्फत आरोपींनी मोटार नागपूर येथे विक्रीसाठी पाठवल्याचे उघडकीस आले. पोलिसांच्या पथकाने सोरदे, पवार यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोटार जप्त केली. दरेकर आणि भडांगे सराइत गुन्हेगार आहेत.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन, अविनाश शेवाळे, गिरीश नाणेकर, दादासाहेब बर्डे, सचिन जाधव, सचिन कदम आदींनी ही कारवाई केली.

Story img Loader