शैक्षणिक संस्थांच्या परिसरात कारवाईस सुरुवात; वर्षभरात ७८१ जणांवर कारवाई

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या पानपट्टय़ांमध्ये तसेच छोटय़ा दुकानांत सर्रास गुटखा, सिगारेटची विक्री केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरातील गुटखा, सिगारेट विक्रे त्यांवर कारवाईस सुरुवात केली आहे. पोलिसांनी ही कारवाई तीव्र केली असून ७८१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात असलेल्या पानपट्टय़ा तसेच छोटय़ा दुकानांतून तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, मात्र काही विक्रेते गुटखा, तंबाखूजन्य पदार्थाची सर्रास विक्री करतात. शहराच्या मध्यभागात अनेक शाळा आहेत. शाळांच्या परिसरातील छोटय़ा दुकानांतून गुटखा, सुपारी मिक्स अशा तंबाखूजन्य पदार्थाची विक्री केली जात आहे. पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून अशा दुकानांवर कारवाई करण्यात येत असल्याने अनेक विक्रेते आडमार्गाने गुटखा, सुपारी मिक्स अशा पदार्थाची विक्री करत आहेत. शाळा, महाविद्यालयांच्या बाहेर तंबाखूजन्य पदार्थाची विक्री करणाऱ्यांवर कारवाईची तीव्र करण्यात आली आहे, अशी माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी दिली.

मुंबईतील कमला मिल परिसरात एका हुक्का पार्लरमध्ये आग लागून घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर हुक्का पार्लरवर बंदी घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाने हुक्का पार्लरवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाईमुळे शहरातील हुक्का पार्लर बंद झाली आहेत. आडमार्गाने हुक्का पार्लर चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. वानवडी, कोंढवा, कोरेगाव पार्क, शिवाजीनगर, विमाननगर, चतु:शृंगी भागातील हुक्का पार्लरवर कारवाई केली.