पुणे : पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात मालमत्तांच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मागील महिन्यात एकूण १७ हजार ७८५ मालमत्तांची विक्री झाली. त्यातील ७० टक्के निवासी मालमत्ता आहेत. मागील वर्षातील याच महिन्याच्या तुलनेत मालमत्तांच्या विक्रीत तब्बल ४६ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे जिल्ह्यातील मालमत्ता क्षेत्राचा जानेवारीचा अहवाल नाइट फ्रँक इंडियाने जाहीर केला आहे. यानुसार, पुणे जिल्ह्यात जानेवारी महिन्यात एकूण १७ हजार ७८५ मालमत्तांची विक्री झाली. या व्यवहारातून ५८९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले आहे. मागील वर्षी जानेवारी महिन्यात एकूण १२ हजार १६६ मालमत्तांची विक्री झाली होती. त्यातून सरकारला ४४१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. मालमत्ता क्षेत्राने मागील २४ महिन्यांतील सर्वोत्तम कामगिरी जानेवारीत नोंदवली आहे.

हेही वाचा – ‘आधी बिहारची निवडणूक, मगच खासदारकीचा विचार…’ भाजपच्या मोठ्या नेत्याची स्पष्टोक्ती

एकूण घरांच्या विक्रीचा विचार करता २५ लाख रुपयांपर्यंत किंमत असलेल्या घरांच्या विक्रीचा वाटा २२ टक्के आहे. त्यानंतर २५ ते ५० लाख रुपयांच्या घरांचा वाटा ३१ टक्के, ५० लाख ते १ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा ३२ टक्के आहे. तसेच, १ ते २.५ कोटी रुपयांच्या घरांचा वाटा १३ टक्के असून, २.५ ते ५ कोटी रुपये आणि ५ कोटी रुपयांवरील घरांचा वाटा प्रत्येकी १ टक्का आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – ‘या’ कारणांमुळे मागासवर्ग आयोगातून मेश्राम यांना हटविल्याचा आरोप

मध्यम आकाराच्या घरांना वाढती मागणी

घरांच्या एकूण विक्रीत ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांचे प्रमाण सर्वाधिक ४१ टक्के आहे. त्याखालोखाल ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांचे प्रमाण ३३ टक्के आहे. एकूण विक्रीत ८०० ते हजार चौरस फुटांच्या घरांचा वाटा १३ टक्के असून, हजार ते दोन हजार चौरस फुटांच्या घरांचा वाटा ११ टक्के आणि दोन हजारांहून अधिक चौरस फुटांच्या घरांचा वाटा ३ टक्के आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sales of houses in pune are booming know which houses are preferred by pune residents pune print news stj 05 ssb
Show comments