पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील संशयित गुंड सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळची चौकशी करण्यासाठी आज सकाळी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची तुकडी पुण्यात दाखल झाली आहे. महाकाळकडून सलमान खानला मिळालेल्या धमकीबाबत चौकशी करण्यासाठी आणि या प्रकरणाशी त्याचा काही संबंध आहे की नाही याबद्दलचा तपास करण्याच्या उद्देशाने मुंबईहून काही पोलीस अधिकारी पुण्यात दाखल झाले आहेत. मागील काही तासांपासून गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी पुणे ग्रामीण अधीक्षक कार्यालयात सिद्धेश महाकाळची चौकशी करत आहेत. महाकाळचा कालच पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय.

नक्की वाचा >> धमकीचं पत्र पाठवण्याआधी सलमानच्या घराची रेकी; विश्वास नांगरे पाटील पोहोचले गृहमंत्र्यांच्या भेटीला

मुसेवाला प्रकरणातील संशयित आरोपींमध्ये महाकाळ…
पंजाबी गायक, काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येत महाकाळचं नाव समोर आले आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील जवाहरके या गावात २९ मे रोजी मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मुसेवाला खून प्रकरणात पंजाब, राजस्थानमधील लाॅरेन्स बिष्णोई टोळीचा हात असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले होते. मुसेवालावर गोळ्या झाडणाऱ्या दहा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. यात मंचरमधील गुंड संतोष जाधव आणि त्याचा साथीदार असणाऱ्या महाकाळचाही समावेश आहे.

सलमान खान धमकीचं पत्र प्रकरणात कसली चौकशी केली जातेय?
संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ यांनी गेल्या वर्षी आंबेगाव तालुक्यात ओंकार बाणखेले याचा वैमनस्यातून गोळ्या झाडून खून केला होता. तेव्हापासून दोघेजण पसार होते. जाधव आणि महाकाळ पंजाब, राजस्थानात पसार झाले होते. राजस्थानात खंडणीसाठी एका व्यावसायिकावर गोळीबार केल्या प्रकरणी जाधवला अटक करण्यात आली होती. राजस्थानातील कारागृहात तो लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आल्याची माहिती समोर आलीय. याच बिष्णोई टोळीनेच सलमान खान आणि त्याच्या वडील सलीम खान यांना धमकीचं पत्र पाठवल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे हे पत्र सौरभ महाकाळच्या माध्यमातून पाठवण्यात आलंय का? या पत्राशी महाकाळचा काही संबंध आहे का याचसंदर्भात ही चौकशी केली जात असल्याचं समजतं.

नक्की वाचा >> Moosewala Murder Case: “त्याने हत्या केली असेल तर…”; पुण्यातील शार्प शूटर संतोष जाधवच्या आईचं भावनिक आवाहन

२० तारखेपर्यंत पोलीस कोठडी
मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित तसेच मोक्का कारवाईनंतर पसार झालेला आरोपी महाकाळ पुणे जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके आणि पथकाने त्याला ताब्यात घेतले. महाकाळला अटक करुन बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मुसेवाला खून प्रकरणात आतापर्यंत पंजाब पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

तीन टीम पुण्यात दाखल
सौरव महाकाळच्या अटकेची माहिती मिळाल्यानंतर पंजाब पोलीस, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या पोलिसांची एक टीम आणि गुप्तचर यंत्रणेचे काही अधिकारी देखील पुण्यात दाखल झाले आहे.

सलमानच्या घरची सुरक्षा वाढवली
५ जून रोजी सलमानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र मिळाले होते, त्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्राच्या गृह विभागाने सलमान आणि त्याच्या वडिलांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

काय आहे धमकीचे प्रकरण?
सलीम खान यांना काही दिवसापूर्वी त्यांच्या घराच्या आवारामध्ये एक पत्र आढळून आले. या पत्रात त्यांना आणि त्यांचा मुलगा म्हणझेच अभिनेता सलमान खानला धमकी देण्यात आली होती. ‘सलमान खानचा सिद्धू मुसेवाला करून टाकू’ असे या पत्रात लिहण्यात आले होते. हे पत्र वाचल्यानंतर सलीम खान यांनी वांद्रे पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.