पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्यात आल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत आहे. अटी आणि शर्तीसह सलून उघडण्याची मुभा महानगरपालिकेने दिली होती. त्यानुसार कंटनमेंट झोन वगळून इतर भागातील बहुतांश सलूनची दुकान खुली झाली आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सलून उघडण्यात आल्याने १ जूनपासून हेअर कट आणि दाढीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री बसू शकते.

पिंपरी-चिंचवड शहराला रेड झोनमधून वगळण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत दुकाने खुली करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार हळूहळू शहरातील दुकाने खुली होत आहेत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी सलून चालकांना महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिलासा देत सलून खुली करण्यास परवानगी दिली. त्यानुसार दोन महिन्यानंतर सलूनची दुकानं परवानगी घेऊन उघडण्यात आली आहेत. सलूनच्या बाहेर सॅनिटायझर ठेवण्यात आले असून आत पाच पेक्षा अधिक खुर्च्या असतील तर तीन जणांना आत हेअर कट करता येईल, असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं होतं.

त्यानुसार सलूनच्या दुकानात नियमांचं पालन झाल्याचं दिसत आहे. शिवाय, कर्मचारी हे तोंडाला मास्क वापरतात. हेअर कट किंवा दाढी झाल्यानंतर कात्रीसह इतर साहित्य हे निर्जंतुक केले जाते. त्यासाठी काही दुकांनामध्ये मशीन वापरल्या जात आहे. परंतु, १ जूनपासून दरवाढ होण्याची शक्यता सलून चालक विशाल अहिरे यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अनेकांच्या खिशाला कात्री बसणार हे नक्की आहे.

Story img Loader