शहरातील संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनी सावित्रीबाई फुले यांच्या १८५व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून रविवारी अभिवादन केले.
पुणे जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांत उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पु. ना. गाडगीळ आणि सन्सतर्फे संशोधन क्षेत्रात असलेल्या जान्हवी जोशी, नूपुरा किलरेस्कर, कर्णबधीर असूनही नृत्यक्षेत्रात आपला ठसा उमटवेल्या प्रेरणा सहाणे आणि अॅनिमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या नेहा कुलकर्णी यांचा ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ‘तळमळीने शिका म्हणणाऱ्या सावित्रीबाई आणि परदेशात जाऊन शिकणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या कतृत्वाची आठवण आपण ठेवली पाहिजे,’ असे मत गावस्कर यांनी व्यक्त केले. यावेळी अमित मोडक, किरण जावळकर, सतीश कुबेर आदी उपस्थित होते. अखिल भारतीय माळी महासंघातर्फे शिल्पकार आर. डी. माळी यांनी साकारलेल्या ‘क्रांती शिल्पा’चे उद्घाटन महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवदास महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. फुले वाडा येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी शहराध्यक्ष युवराज भुजबळ, जिल्हाध्यक्ष विजय कोल्हे, नगरसेविका प्रभाताई महाले आदी उपस्थित होते.
स्त्री आधार केंद्रातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या सारसबागेसमोरील पुतळ्यास आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी गटनेते अशोक हरणावळ, सचिन तावरे, सरोज पाईकराव, शेलार गुरूजी आदी उपस्थित होते. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सावित्रीबाईंच्या कार्यावर तुकाराम पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अॅड. अभय छाजेड, अंजली निम्हण, विठ्ठलराव गायकवाड, उत्तम भूमकर आदी उपस्थित होते. पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या मागासवर्गीय विभागातर्फे कात्रज येथील मनपा शाळेतील शिक्षिका विनीता गवळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मुकेश धिवार, समीरा गवळी, सायली पित्रे आदी उपस्थित होते. भारिप बहुजन महासंघ महिला आघाडीतर्फे दांडेकर पूल ते स्वारगेट येथील सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी अॅड वैशाली चांदणे, उमेश चव्हाण आदी उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, पुणे शहर यांच्या तर्फे अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महेंद्र कांबळे, एम. डी. शेवाळे, लतिका साठे आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पुणे शहर आणि राष्ट्रवादी महिला कॉँग्रेस पार्टी पुणे शहर यांच्यातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी अॅड. वंदना चव्हाण, शफी मामू शेख, रुपाली चाकणकर आदी उपस्थित होते. राष्ट्रीय समाज पक्षातर्फे समता भूमी येथे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी डॉ. उज्ज्वला हाके, अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होत्या.

Story img Loader