तीन महिन्यांपूर्वी देशातील सत्तेत परिवर्तन झाल्यानंतर सर्वाची धावपळ सुरू झाली आहे. त्यांनी सवलती देणे सुरू केले आहे. मात्र, आता महाराष्ट्रातसुद्धा सत्ता परिवर्तन अटळ असून येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यात महायुतीची सत्ता येणार आहे, असा विश्वास केंद्रीय माहिती, प्रसारण व पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी व्यक्त केला.
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समता परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘आद्यक्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार’ बिशप एन.एल. करकरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी जावडेकर बोलत होते. याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी आफ इंडियाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले, समता परिषदेचे अध्यक्ष हनुमंत साठे, कमल करकरे, आरपीआयचे शहाराध्यक्ष महेंद्र कांबळे, अर्जुन डांगळे, शिवसनेचे शहराध्यक्ष शाम देशपांडे आदी उपस्थित होते.
जावडेकर म्हणाले की, देशात तीन महिन्यांपूर्वी मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर विरोधकांची धावपळ सुरू झाली आहे. विविध सवलती देणे सुरू केले आहे. मात्र, महाराष्ट्राच्या सत्तेत परिवर्तन अटळ असून तीन महिन्यांत महायुतीची सत्ता येणार आहे. मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे, या हेतूने गरिबांनी घडविलेले हे परिवर्तन आहे. शिक्षण सर्वांपर्यंत पोहचविणे यासाठी मोदी सरकार काम करेल. देशाला समृद्धीकडे घेऊन जाणे हे या सरकारचे ध्येय राहणार आहे.
आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपकडे जाऊ नका म्हणून हे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सांगत होते. मात्र, या सरकारने भ्रष्टचार केला आहे. अन्यायामध्ये वाढ होत आहे. त्यामुळे आता महायुतीला सत्ता मिळणार आहे. लहुजी वस्ताद साळवे यांच्या नावाने सुरू केलेला पुरस्कार चांगला असून त्याच्या पारितोषिकाच्या रकमेत पुढील वर्षी वाढ करा, असे आठवले यांनी सांगितले. बिशप करकरे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मूलमंत्रामुळे मी या ठिकाणापर्यंत पोहोचलो आहे. त्यामुळे सर्वानी शिक्षणाचे महत्त्व समजून घ्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा