जादुटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त हवं यासाठी पुण्यातील एका २७ वर्षीय महिलेचा सासरच्या लोकांनी हातपाय बांधून छळ केल्याचा गंभीर गुन्हा उघड झाला. यानंतर त्यावर राज्यातून जोरदार प्रतिक्रिया येत आहेत. याच पार्श्वभूमीवर मागील अनेक वर्षांपासून स्त्रियांचं आरोग्य आणि मासिक पाळी यावर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेने प्रतिक्रिया दिली आहे. समाजबंधचे कार्यकर्ते सचिन आशासुभाष यांनी पाळीच्या काळात महिलांना सन्मानजनक वागणूक मिळत आहे का? असा प्रश्न विचारला.
सचिन आशासुभाष म्हणाले, “पुण्यातील घटना फारच दुर्दैवी आहे. एकिकडे मासिक पाळीतील रक्त अशुद्ध समजून महिलांना धार्मिक विधी करण्यापासून बाजूला ठेवलं जातं. दुसरीकडे त्याच रक्ताचा उपयोग मांत्रिकाकडून अघोरी कृत्यासाठी केला जातो. ते रक्त मिळवण्यासाठी एका विवाहितेला तिचे सासरचेच लोक बळजरीने विवस्त्र करतात आणि रक्त काढून मांत्रिकाला ५० हजार रुपयांना विकतात. हे फारच दुर्दैवी आहे.”
“ही फसवणूकही आहे आणि जादुटोणा विरोधी कायद्यानुसार दंडनीय गुन्हा आहे. याशिवाय हा विनयभंगाचाही प्रकार आहे. महिलांना मासिक पाळीच्या काळात आरामाची गरज असते. त्या काळात या महिलेवर शारिरीक हिंसा झाली. घरच्याच मंडळींकडून घडलेल्या या प्रकारानंतर त्या महिलेची मानसिक स्थितीचा आपण विचारही करू शकत नाही. या कृत्याविरोधात त्या महिलेने मागितलेली दात निश्चितच कौतुकास्पद आहे. पोलिसांनी आधी ही तक्रार घेण्यासाठी टाळाटाळ केली हे दुर्दैवी आहे,” असं मत सचिन आशासुभाष यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
मासिक पाळीतील रक्त काय असतं?
सचिन आशासुभाष यांनी मासिक पाळीच्या रक्ताविषयी सांगितलं. ते म्हणाले, “मासिक पाळीतील रक्ताचा पवित्रतेची, अपवित्रतेशी किंवा धर्माशी कसलाही संबंध नसतो. गर्भधारणा होण्यासाठी शरिराला रक्त व मांसपेशींचे अस्तर तयार करावे लागते. गर्भधारणा न झाल्याने हे रक्त आणि मांसपेशींचे अस्तर दरमहिन्याला महिलांच्या शरीरातून बाहेर फेकले जाते. त्यालाच मासिक पाळीतील रक्त असं म्हटलं जातं.”
“ही सहजसुलभ आणि नैसर्गिक प्रक्रिया प्रत्येक जाती-धर्मातील, धर्म मानणाऱ्या आणि न मानणाऱ्या प्रत्येक स्त्रिच्या शरिरात घडत असते. ही नैसर्गिक बाब आहे, मात्र त्याला धर्माची जोड देऊन महिलांना धार्मिक विधी करण्यापासून मज्जाव करणं किंवा त्याचा अंतर्भाव चुकीचा धार्मिक विधी करण्यासाठी करणं हे दोन्ही निंदनीय आहे,” असं मत सचिन आशासुभाष यांनी व्यक्त केलं.
ते पुढे म्हणाले, “ही माहिती समाजात पोहचवण्याची नितांत गरज आहे. मासिक पाळीकडे नैसर्गिक प्रक्रिया म्हणून पाहिलं पाहिजे. तसेच कुठल्याही धर्माचं लेबल त्याला लावता कामा नये. मासिक पाळीच्या आधारे कोणतेही धार्मिक विधी करणं किंवा धार्मिक विधी करायला मज्जाव करणं हे दोन्हीही धर्माच्या नावाखाली केले जाणारे शोषण आहे.”
हेही वाचा : VIDEO: सासरच्यांनी सुनेचे हातपाय बांधून मासिक पाळीचं रक्त विकलं, चंद्रकांत पाटील म्हणाले, “भयंकर…”
“पाळीच्या रक्ताचा वापर करून जादू्टोणा करणं हा दुहेरी फसवणूक आणि दंडनीय गुन्हा आहे. पाळीच्या काळात महिलेला सकस आहार, पुरेसा आराम, स्वच्छता आणि सकारात्मक वागणूक मिळणं हा प्रत्येक महिलेचा मानवाधिकार आहे. या चारही बाबींचं उल्लंघन या घटनेत घडलेलं आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.
“ज्या काळात तिला आराम मिळालं पाहिजे त्या काळात तिचे हातपाय बांधणं, रक्त जमा करण्यासाठी तिच्या शरिरासोबत छेडछाड करणं हे विकृत आणि अमानवी आहे. धर्माच्या नावाने व पैशांच्या प्रलोभनातून घडलेल्या या घटनेचा समाजबंध निषेध करतं. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली तरच अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल,” असंही त्यांनी नमूद केलं.