‘थीम पार्क’ च्या संकल्पनेतून आध्यात्मिक पर्यटनाचा आनंद देण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्य़ातील सज्जनगडाच्या पायथ्याशी श्री समर्थ रामदास स्वामींचा जीवनप्रवास उलगडून दाखविणारा प्रकल्प साकारण्यात आला आहे.
‘गार्डियन मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट’ च्या वतीने व ‘ज्ञानश्री इंजिनिअरिंग इन्स्टिटय़ूट’ च्या सहकार्याने साकारण्यात आलेल्या या ‘थीम पार्क’ बाबतची माहिती गार्डियन कार्पोरेशनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मनीष साबडे व ज्ञानश्री इन्स्टिटय़ूटचे ज्ञानेश्वर वांगडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘गार्डियन मिडिया अॅण्ड एंटरटेनमेंट’ चे संचालक संजय दाबके व प्रकल्पाचे समन्वयक अरुण गोडबोले हे त्या वेळी उपस्थित होते.
सज्जनगडाच्या पायथ्याशी सुमारे दोन एकर जागेमध्ये हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. समर्थ दर्शनामध्ये पुतळे, कटआऊट्स  व चित्रांच्या माध्यमातून समर्थाच्या जीवनातील पंधरा प्रसंगांची निर्मिती करण्यात आली असून, त्याला माहितीपूर्ण निवेदनाची जोड देण्यात आली आहे. आठ हजार चौरस फुटाच्या दालनात समर्थ जीवन दर्शन उभारण्यात आले आहे. त्याच्या शेजारीच चार हजार चौरस फुटाच्या दालनात समर्थानी स्थापन केलेल्या अकरा मारुतींच्या प्रतिकृती त्यांच्या माहितीसह सादर करण्यात आल्या आहेत.
समर्थाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जांब, टाकळी, चाफळ, शिवथरघळ, धुळे व सज्जनगड या ठिकाणांची माहिती देणारा वीस मिनिटांचा माहितीपटही या उपक्रमांत दाखविण्यात येतो. त्यासाठी दीडशे आसनांची सोय असणाऱ्या प्रेक्षागृहाची उभारणी करण्यात आली आहे. रामोजी फिल्म सिटीच्या उभारणीत महत्त्वाचा तांत्रिक वाटा असणाऱ्या पथकाने या प्रकल्पासाठी काम केले आहे. हा प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात आला असून, प्रौढांसाठी ६० रुपये, तर मुलांसाठी ३० रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे.
समर्थाच्या जीवनावर आधारित या प्रकल्पाबरोबरच संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘थीम पार्क’ आळंदी व देहू येथे उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जागा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे या वेळी सांगण्यात आले.