पुणे विद्यापीठाचा ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा होत असलेला नामविस्तार अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेला मान्य असल्याचे परिषदेचे कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारामध्ये विद्यापीठाच्या नावातून ‘पुणे’ हा शब्द वगळावा, अशी मागणी भारिप-बहुजन महासंघाचे नेते राजा ढाले यांनी केली होती. त्याला विरोध करीत नामविस्ताराला विरोध करणाऱ्या ढाले यांचा बोलविता धनी कोण आहे, अशी विचारणा परशुराम वाडेकर यांनी केली होती. त्या पाश्र्वभूमीवर हा नामविस्तार आम्हाला मान्य असल्याचे समता परिषदेने स्पष्ट केले आहे.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा करण्याचा ठराव विद्यापीठाच्या अधिसभेने संमत केला आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे. विद्यापीठाच्या नामविस्तारातून पुणे हा शब्द वगळावा, अशी समता परिषदेची भूमिका नाही. मात्र, हा नामविस्तार करण्याची कार्यवाही लवकरात लवकर झाली पाहिजे, अशीच अपेक्षा असल्याचे कृष्णकांत कुदळे यांनी सांगितले.
राजा ढाले यांचा नामोल्लेख टाळून प्रा. हरी नरके म्हणाले, प्रबोधन परंपरेमध्ये पुण्याचा वारसा व्यापक आणि समृद्ध आहे. लोकशाहीमध्ये विचारस्वातंत्र्य असल्याने प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणी काय म्हणावे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. पुणे विद्यापीठाचा नामविस्तार सलोख्याच्या वातावरणात होत असताना त्यामध्ये खोडा घालण्याचे काम काही मंडळी जाणीवपूर्वक करीत आहेत. त्याकडे दुर्लक्षच केलेले बरे होईल.
महात्मा फुले समता पुरस्कार
कुमार केतकर यांना जाहीर
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे ज्येष्ठ पत्रकार आणि ‘दिव्य मराठी’चे प्रमुख संपादक कुमार केतकर यांना यंदाचा ‘महात्मा फुले समता पुरस्कार’ जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, महात्मा फुले पगडी आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त गुरुवारी (२८ नोव्हेंबर) समता भूमी येथील महात्मा फुले राष्ट्रीय स्मारक येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या हस्ते केतकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती कृष्णकांत कुदळे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samata parishad supports pune universitys new name
Show comments