भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गुन्हा दाखल झालेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात पुरेसे पुरावे न मिळाल्याने त्यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिसांकडून राज्य मानवी हक्क आयोगाला देण्यात आली आहे. तसा अहवाल आयोगाला सादर करण्यात आला आहे.

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात भिडे यांच्या विरोधात पुणे ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात ४१ आरोपीं विरोधात यापूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यात भिडे यांचे नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून मानवी हक्क आयोगापुढे झालेल्या सुनावणी दरम्यान नुकतीच देण्यात आली. संभाजी भिडे यांचा हिंसाचार प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग नसल्याचे आढळून आल्याचे पोलिसांनी मानवी हक्क आयोगापुढे सांगितले. १ जानेवारी २०१८ रोजी भीमा-कोरेगाव येथे दोन गटात हिंसाचार झाला होता. या प्रकरणात संभाजी भिडे यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. तक्रारीनुसार पोलिसांनी तपास केला. त्यात संभाजी भिडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळून आला नाही. त्यामुळे त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आलेला नाही, असे संभाजी भिडे यांचे वकील पुष्कर दुर्गे यांनी सांगितले.

Story img Loader