महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी वादग्रस्त विधान केल्यानंतर, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील नेते आक्रमक झाले आहेत. संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याच दरम्यान पुण्यातील कसबा पेठेतील फडके हौद चौकात काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी मन्या तुझी लायकी काय? महात्माजींवर बोलतोय काय? या आशयाचे फलक हातामध्ये घेऊन निषेध नोंदविण्यात आला.
यावेळी एक कार्यकर्ता पुढे येत पोस्टर जाळून निषेध नोंदविण्याचा प्रयत्न करीत होता. तेव्हा दुसर्या एक कार्यकर्ता भिंडेंच्या पोस्टरला जोडे मारत होता. पण, याच पोस्टरखाली असलेल्या राहुल गांधींच्या फोटोला जोडे मारण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाची पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली. या आंदोलनाबाबत अरविंद शिंदे म्हणाले की, “संभाजी भिडे हे समाजात तेढ निर्माण करणारे विधान सातत्याने करीत आहेत. राज्य सरकारने या विकृत व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून अटक करावी. संभाजी भिडेंवर कारवाई न झाल्यास भविष्यात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला.”