पुणे : संभाजी ब्रिगेडने शिवसेना (ठाकरे) पक्षाबरोबरची युती तोडण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या कोट्यातून किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन शिवसेना नेत्यांनी न पाळल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, संभाजी ब्रिगेड विधानसभेच्या ५० जागा स्वतंत्रपणे लढविणार आहे.
संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲड. मनोज आखरे, मुख्य प्रवक्ते गंगाधर बनबरे, उपाध्यक्ष अभिमन्यू पवार आणि प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी ही भूमिका बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या वेळी जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, प्रदेश सहसंघटक मनोजकुमार गायकवाड, शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष ज्योतिबा नरवडे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा : मावळ विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटात बापू भेगडे यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार
‘दोन वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना (ठाकरे) पक्षात युती झाली. मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकही जागा न घेता संभाजी ब्रिगेडने शिवसेना आणि महाविकास आघाडीचा प्रचार केला. महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले, त्या वेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या कोट्यातून विधानसभेला संभाजी ब्रिगेडला किमान चार ते पाच जागा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, विधानसभेच्या जागावाटपात संभाजी ब्रिगेडला सन्मानपूर्वक स्थान आणि आश्वासनानुसार जागा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेबरोबरची युती तोडून महाविकास आघाडीतून बाहेर पडत आहोत,’ असे आखरे यांनी सांगितले.
हेही वाचा : ‘ससून’वरील ताण कमी होणार! अतिरिक्त पोलीस आयुक्तांचे वानवडी, हडपसर पोलिसांना आदेश
पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील ५० जागा संभाजी ब्रिगेड लढविणार आहे. येत्या दोन ते तीन दिवसात उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाईल.