अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली जावी, अशी मागणी केली आहे. भाजपाने संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या चर्चेत आहेत. यानिमित्ताने भाजपाने देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व अधोरेखित केलं असून, त्यांच्यासाठी राष्ट्रीय राजकारणाचे दरवाजे खुले केले असल्याची चर्चा रंगली आहे. या संदर्भात आज पुण्यात माध्यमांनी संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. शिवसह्याद्री यूथ फाउंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी ते आले होते.
या पार्श्वभूमीवर बोलताना संभाजीराजे म्हणाले, “कोण काही बोलत असेल तो त्याच्या अंतर्गत प्रश्न आहे. एक समाज कशाला, मला वाटतं देवेंद्र फडणवीस हे सर्व समाजाचे आहेत. ते एका समाजाचे असू शकत नाही. ते मुख्यमंत्री होते, आज उपमुख्यमंत्री आहेत. जर खासदार व्हायच असेल तर ते एका समाजाचे होऊ शकत नाही. त्यांना सर्व समाजातील लोक पाठिंबा देतील असं माझ मत आहे. ते एक चांगल नेतृत्व असून त्यामध्ये काही दुमत नाही किंवा शंका नाही. पण शेवटी राजकारणात वेळेवर काही निर्णय घेतले जातात.”
…माझी त्यांना एकच विनंती आहे की असं काही करू नका –
तसेच, मराठा क्रांती ठोक मोर्चा उपमुख्यमंत्र्याच्या घरावर मोर्चा काढणार आहे. या संदर्भात बोलताना संभाजीराजेंनी सांगितले की, “आपली भूमिका मांडण्याचा अधिकार सर्व संघटनांना आहे. स्वराज्य संघटनेचा हाच मुद्दा आहे की सर्व संघटनांना ताकद देणे. आज आबा पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी मोर्चा काढण्याच ठरवले आहे. माझी त्यांना एकच विनंती आहे की असं काही करू नका.जेणेकरून कायदा आपण हातात घेऊ.”
…परंतु गरीब मराठ्यांना देखील आरक्षण द्या –
दहीहंडी खेळाडूंना शासकीय नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यावरून टीका होत आहे. “ दहीहंडी हा जर राज्य क्रीडा प्रकार म्हणून घेतला जात असेल तर चांगली बाब आहे. हा खेळ पुणे, मुंबई आणि महाराष्ट्रात खेळला जातो. जर त्याला दर्जा दिला जात असेल तर चांगली बाब आहे. यासाठी जे पाच टक्के आरक्षण देण्याचं म्हणतात ती देखील चांगली बाब आहे, परंतु गरीब मराठ्यांना देखील आरक्षण द्या, हे देखील त्यांनी लक्षात ठेवावं. ”