पुणे : मी आजपर्यंत छगन भुजबळ यांना फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचारांचा वारसदार समजत होतो. मी भुजबळ यांच्या घरी जाऊन त्यांची प्रशंसा केली होती. मात्र त्यांचे शुक्रवारचे भाषण ऐकल्यानंतर त्यांनी जी पातळी गाठली आहे. त्यामुळे त्यांना मी फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसदार म्हटल्याचा मनस्ताप होत आहे, अशा शब्दांत स्वराज पक्षाचे प्रमुख माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली.
मराठा आरक्षणासंदर्भात पुण्यात राज्य मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘ओबीसी कोटय़ातून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात एल्गार सभेमध्ये भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर वैयक्तिक टीका केली. तसेच मराठा समाजाबद्दल अत्यंत हीन भाषा वापरत टिप्पणी केली. भुजबळ यांना मी समक्ष भेटल्यानंतर याबाबत जाब विचारणार आहे. मी त्यांना यापूर्वी भेटल्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचे खरे वारसदार असा गौरव केला होता. मात्र शुक्रवारचे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर मला मनस्ताप झाला आणि त्यांच्याबद्दलचा आदर कमी झाला. गुण्यागोविंदाने राहणाऱ्या सर्व जाती-धर्माच्या लोकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याची भाषा भुजबळ यांनी केली आहे.’ असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.
हेही वाचा >>>“विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांची इच्छा नसते, पण…”, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी स्पष्टच सांगितले
‘मराठा आरक्षण हा सोपा विषय नाही!’
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करावा लागेल. त्यामुळे मराठा आरक्षण हा विषय सोपा नाही, अशा शब्दांत संभाजीराजे छत्रपती यांनी आरक्षणासाठी काही काळ लागणार असल्याबाबत शनिवारी पुण्यात सूतोवाच केले. ‘१५ दिवसांपूर्वी आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानुसार शनिवारी पुण्यात बैठकीआधी आयोगाने वेळ दिली. आयोगासमोर मराठा समाजाचे काही प्रश्न मांडले. आयोग स्वायत्त आहे. त्यावर कोणाचे बंधन नाही. मी समाजाच्या वतीने मांडलेल्या प्रश्नांची आयोगाने उत्तरे दिली नाहीत, मात्र या मुद्दय़ांचा विचार केला जाईल, असे सांगितले.