पिंपरी : एव्हरेस्टसारख्या शिखरावर चढाई करणे ही एक प्रकारची लढाईच आहे. कसलेल्या गिर्यारोहकांची जन्म मरणाची ही कसोटी असते. त्यामध्ये यशस्वी झालेल्या गिर्यारोहकांचा केंद्र व राज्य सरकारने सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यावे यासाठी आपण सरकार दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगत या साहसी क्रीडा प्रकारची शासकीय पातळीवर दखल घेतली जात नसल्याची खंत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
संभाजीराजे यांच्या हस्ते चऱ्होली येथे एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांच्या ‘सागरमाथा – गाथा एव्हरेस्टच्या विजयाची’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्येष्ठ गिर्यारोहक ऋषीकेश यादव, महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण, ज्ञान आशा फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अमित आंद्रे, ज्ञानेश्वर तापकीर, माजी महापौर नितीन काळजे, साहित्यिक व कामगार नेते अरूण बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा – पुण्यातील ‘हे’ दोन मेट्रो मार्ग पूर्ण, मोदींच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
हेही वाचा – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यात का घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट?
गिर्यारोहण हे सामान्य व्यक्तीच्या कुवतीचे नाही. एव्हरेस्ट शिखरावर जाऊन भारताचा राष्ट्रध्वज उंचावणाऱ्या या खेळाडूंचा यथोचित सन्मान केंद्र व राज्य सरकारने करायला हवा. एवढेच नाही, तर त्यांना प्रोत्साहन देण्याची कायमस्वरूपी योजना असायला हवी. यासाठी आपण स्वतः पाठपुरावा करू. भारतातील इतर राज्यांमध्ये एव्हरेस्टवीर अथवा इतर मोहीमवीर गिर्यारोहकांना भरीव आर्थिक मदत देण्यात येते, ती व्यवस्था महाराष्ट्रात नसावी, उलट शासनाने या साहसी खेळाचा समावेश पर्यटनामध्ये केला आहे. मी गिर्यारोहकांच्या पाठीशी सदैव उभा राहीन. सागरमाथा हे पुस्तक हे केवळ गिर्यारोहकांनाच नव्हे तर आव्हानात्मक काम करणाऱ्या प्रत्येकाला मार्गदर्शक ठरेल असेही संभाजीराजे म्हणाले.