माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतल्यानंतर सरकारवर नाराजी व्यक्त केली. आयोगाला भेट दिली मात्र त्यांचं कार्यालय १ हजार चौरस फूटही नाही. त्यामुळे ही बैठक सर्किट हाऊसला घ्यावी लागली, अशी खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली. तसेच आयोगाला पायाभूत सुविधा, निधी नसेल, तर तो काम कसा करणार, असा प्रश्नही विचारला. ते शनिवारी (१८ नोव्हेंबर) पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “१५ दिवसांपूर्वी मी राज्य मागासवर्ग आयोगाला पत्र लिहून भेटण्यास वेळ देण्याची मागणी केली होती. त्याप्रमाणे त्यांनी आज पुण्यात बैठक असताना मला निमंत्रित केलं. म्हणून मी आज त्यांना भेटायला आलो. या बैठकीत मी समाजाचे १०-१२ प्रश्न मांडले. यात मराठा समाजाला आरक्षण कसे मिळू शकते, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कशाप्रकारे लागू होऊ शकतात, आरक्षणासाठीची आंदोलने अशा अनेक विषयांचा समावेश आहे.”
“मला वाईट इतकंच वाटलं की, मी…”
“मला वाईट इतकंच वाटलं की, मी राज्य मागासवर्ग आयोगाला भेट दिली. माझी बैठक तेथेच होईल, असं मला अपेक्षित होतं. मात्र, मागासवर्ग आयोगाला दिलेलं कार्यालय १००० चौरस फूटही नसेल. त्यामुळे त्यांनी मला सर्किट हाऊसला बोलावलं. पुण्यासारख्या ठिकाणीही राज्य मागासवर्ग आयोगाचं कार्यालय एक हजार चौरस फूटही नाही. अशा स्थितीत ते सर्व्हे करणं, माहिती संकलित करणं अशी कामं कशी करू शकतात,” असा प्रश्न संभाजीराजेंनी व्यक्त केलं.
हेही वाचा : “मला मुख्यमंत्री करा मग”; संभाजीराजे छत्रपतींचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
“माझी सरकारला विनंती आहे की, सरकारने पैसे दिल्याशिवाय…”
“माझी सरकारला विनंती आहे की, सरकारने पैसे दिल्याशिवाय मागासवर्ग आयोग मजबूत होऊ शकणार नाही. आयोगाकडेच पायाभूत सुविधा नसतील, तर ते काम कसं करणार? आयोगाकडून काम करून घ्यायचं असेल, तर सरकारने ताबोडतोब आयोगाला पायाभूत सुविधा, कार्यालय, निधी दिला पाहिजे. सरकारने युद्धपातळीवर आयोगाला मदत केली पाहिजे. त्याशिवाय आयोगाला इंपेरिकल डेटा गोळा करायला लावण्यात अर्थ नाही,” असंही संभाजीराजेंनी नमूद केलं.