जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य केला आहे. सरकारने पाच वर्षे कारभार करावा, आम्ही विरोधी पक्षात राहू. सरकार पाडण्याचे किंवा मध्यावधी निवडणुकांचे ‘पिल्लू’ आम्ही सोडलेले नाही. सत्तेत एकत्र असताना एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या भाजप-सेनेतील विसंवाद हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, त्यांना फुकटचा सल्ला आम्ही का द्यावा, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आकुर्डीत पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले. याकूब मेमनवरील आरोप सिध्द झाले आहेत. न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्यात राजकारण येता कामा नये, असेही ते म्हणाले.
पवार म्हणाले, शिवसेना आणि भाजपमध्ये ‘सामना’ व ‘तरूण भारत’च्या माध्यमातून जे चालले आहे, ती त्या दोन पक्षातील अंतर्गत बाब आहे. काय करायचे ते त्यांनी ठरवावे. सरकारचे भवितव्य शिवसेनेवर अवलंबून आहे. मध्यावधी निवडणुकीचे पिल्लू आमचे नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करू. सरकारने सर्वच स्तरात विरोधी निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. ‘अच्छे दिन’ कुठेच दिसत नाहीत. भाजप जातीयवादी पक्ष असून त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. निवडणुका झाल्यानंतर त्रिशंकू अवस्था होती म्हणून आम्ही त्यांना पािठबा देऊ केला. कारण, दुसऱ्याच दिवशी निवडणुका घ्यायच्या नव्हत्या. भाजपने नंतर शिवसेनेची मदत घेतली आणि कसा कारभार सुरू आहे, ते नागरिक पाहत आहेत. व्यापारी वर्गाला जकात, एलबीटी दोन्ही मान्य नाही. एलबीटी रद्द करू म्हणणाऱ्या भाजप सरकारने तसे काही केले नाही. त्यामुळे व्यापारी पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. वस्तू व सेवाकराचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. तेव्हा भाजपने विरोध केला होता. आता ते त्याविषयी बोलत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा