प्रथमेश गोडबोले
कोथरूड परिसरात पौड रस्त्यावर शिवतीर्थनगर येथे साम्राज्य बळवंतपूरम सोसायटी आहे. उन्हाळी शिबिर, रक्तदान शिबिर, स्पोर्ट्स कार्निव्हल, जल्लोष असे विविध उपक्रम सोसायटीतर्फे राबवले जातात. तसेच दहिहंडी, गणेशोत्सव, दिवाळी पहाट असे पारंपरिक सण-उत्सवही विविध उपक्रमांद्वारे साजरे केले जातात. हे उपक्रम साजरे करताना सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. विविध उपक्रमांमध्ये लहान मुले, तरुणांबरोबरच ज्येष्ठ नागरिकांचाही सक्रिय सहभाग असतो. ‘लोकसत्ता’ आयोजित गणेशोत्सव स्पर्धेमध्येही सोसायटीने पारितोषिक पटकावले आहे. रोटरी क्लबच्या वतीने आयोजित एकांकिका स्पर्धामध्ये तब्बल सहा पारितोषिके सोसायटीने मिळवली आहेत. सोसायटीने ज्येष्ठ नागरिकांसाठी साम्राज्य ज्येष्ठ नागरिक मंच तसेच स्नेह सखी मंचही स्थापन केला आहे.
पौड रस्त्यावरील कोथरूड भागात शिवतीर्थनगर परिसरात ६४२ सदनिकांची साम्राज्य बळवंतपूरम सोसायटी आहे. सोसायटीतर्फे वर्षांतील सहा महिने विविध उपक्रम राबवले जातात. सोसायटीत साजरा होणारा वैशिष्टय़पूर्ण स्पोर्ट्स कार्निव्हल एक महिन्याचा असतो. जल्लोष हा उपक्रम व्यावसायिक पद्धतीने दरवर्षी डिसेंबर महिन्यात तीन दिवस आयोजित करण्यात येतो. या तीन दिवसात एकांकिकांचे सादरीकरण, गीतांचे सादरीकरण असे विविध कार्यक्रम असतात. गणेशोत्सवात प्रत्येक सदनिकाधारकाकडून पाचशे रुपये वर्गणी घेऊन पाच दिवस विविध कार्यक्रम सादर केले जातात. गणेशोत्सवात एका वर्षी ‘लाइट आणि साउंड शो’ तयार करण्यात आला होता. त्यामध्ये गणराय ढोलावर विराजमान झाले होते आणि ते स्वत:ची ओळख करून देत आहेत, असा प्रसंग होता. यामध्ये तानपुरा स्वत:चे स्वर मांडतो. शंख आपला नादध्वनी घेऊन येतो. हार्मोनियम आपल्या स्वरांवर समोरच्या श्रोत्यांना स्वरसैर घडवून आणते. तबला आपल्या लयीमध्ये श्रोत्यांना डोलायला भाग पाडतो, अशा पद्धतीने हा शो तयार करण्यात आला होता.
याबरोबरच गणेशोत्सवात पाच दिवसात गणरायांची आगमन मिरवणूक, प्राणप्रतिष्ठा, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, व्याख्यान, कथाकथन, एकपात्री प्रयोग, लहान मुलांसाठी गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा, घरगुती गणपती सजावट स्पर्धा असे कार्यक्रम आयोजित केले जातात. सोसायटीमधील संगीत विशारद आणि ज्यांनी व्यावसायिक पातळीवर संगीत पोहोचवले आहे, असे सर्वजण एकत्र येऊन दर्जेदार सुगम संगीताची मैफल सादर करतात. गणेशोत्सवाचा समारोप सोसायटीच्या सभासदांच्या साम्राज्य ढोलपथकाच्या सादरीकरणाने होतो. मात्र, सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून केवळ आठ ढोलवादक आणि चार ताशावादक आपली कला सादर करतात.
या बरोबरच उन्हाळी शिबिर, रक्तदान शिबिर, जल्लोष असे विविध उपक्रमही राबवले जातात. दहिहंडी, गणेशोत्सव, दिवाळी पहाट असे पारंपरिक सण-उत्सवही विविध उपक्रमांद्वारे साजरे केले जातात. सोसायटीमधील सर्व मुलांसाठी समर कॅम्पचे आयोजन केले जाते. त्यामध्ये दीडशे मुले सहभागी होतात. तसेच दरवर्षी जून महिन्यात दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या सहयोगाने सोसायटीमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. दीडशेपेक्षा अधिक रक्तदाते या शिबिरात रक्तदान करतात. दहिहंडी हा उत्सव प्रत्येक वर्षी एक सामाजिक संदेश घेऊन उत्साहात साजरा होतो.
सोसायटीने ज्येष्ठ नागरिकांसाठी साम्राज्य ज्येष्ठ नागरिक मंच आणि स्नेह सखी मंच स्थापन केले आहेत. या दोन्ही मंचच्या माध्यमातूनही विविध उपक्रम वर्षभर राबवले जातात. सोसायटीने सामाजिक भानही जपले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांसाठी (मोलकरणी) सोसायटीतर्फे आरोग्य शिबिर आयोजित केले जाते. अस्थिरोगविषयक व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी आयोजित करण्यात येते.
सोसायटीची मिळून एक सांस्कृतिक समिती आहे. साम्राज्य सांस्कृतिक मंडळ असे समितीचे नाव असून त्या माध्यमातून सर्व उपक्रम राबवले जातात. गावाकडून आणलेल्या संस्काराच्या शिदोरीची देवाणघेवाण येथे होते. ६४२ सदनिकांमधील ज्येष्ठांचे प्रतिनिधीत्व करणारी एक टीम ज्येष्ठ नागरिक मंच या नावाने मार्गदर्शकाच्या स्वरूपात नेहमीच कार्यरत असते. या मंचचे १२० सदस्य विविध उपक्रम हाती घेत असतात. याबरोबरीने संपूर्ण सोसायटीसाठी ‘सीएफएमसी’ ही एकत्रित सोयीसुविधा सांभाळणारी, कायदा-सुव्यवस्था पाहणारी १४ जणांची मुख्य टीम आहे. वर्षभर सोसायटीचे कामकाज सुरळीत आणि आनंदाने हाताळणारी ही मंडळी आहे. सोसायटीची स्वत:ची पर्जन्यजल पुनर्भरण सुविधा आहे. त्याचबरोबर सोसायटीमध्ये जमा होणारा ओला कचरा एकत्रित करून त्यापासून खतनिर्मिती करण्याचा सोसायटीचा प्रकल्प आहे. तसेच या प्रकल्पातून होणाऱ्या खताची विक्रीही केली जाते आणि सोसायटीमध्ये बागकामासाठी वापरले जाते. याच प्रकल्पासाठी सोसायटीला संपूर्ण देशात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एका खासगी वृत्तवाहिनीकडून प्रथम पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. सोसायटीसाठी सातत्याने सांस्कृतिक उपक्रम करणारी काही मंडळी आहेत.
ऑक्टोबरमध्ये नवरात्र उत्सव मोठय़ा भक्तीभावाने साजरा होतो. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या स्पोर्ट्स कार्निव्हल या उपक्रमात संपूर्ण सोसायटीतील लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळींपर्यंतच्या सभासदांसाठी वेगवेगळ्या खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात. ज्यात ४० हजारांपर्यंतची पदके पारितोषिक स्वरूपात दिली जातात. या स्पर्धामधून शहर पातळीवरील आणि राज्य पातळीवरील स्पर्धामध्ये सोसायटीतील विद्यार्थी, सभासद आपला ठसा उमटवतात.
सोसायटीत डिसेंबर महिन्यात जल्लोषोत्सव हा तीन दिवसांचा सांस्कृतिक उत्सव साजरा केला जातो. यामध्ये सोसायटीमधील दोन हजार सभासद उपस्थित असतात. याच कार्यक्रमात दोन अंकी नाटकापासून ते ऑर्केस्ट्रापर्यंतच्या कार्यक्रमांचे सादरीकरण केले जाते. सोसायटीने सन २०१४ मध्ये आशियाना करंडक आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेत प्रथम क्रमांक, २०१६ मध्ये आशियाना करंडक आंतर सोसायटी एकांकिका स्पर्धेत (वैयक्तिक सर्व विभाग पुरस्कार) प्रथम क्रमांक पटकावला आहे. याचबरोबर सोसायटीमध्ये नेचर क्लब, रनर्स क्लब, संगीत-स्वर साम्राज्य ग्रुप, एनजीओ हेल्पिंग टीम अशा विभागांच्या माध्यमातून संपूर्ण वर्षभर उपक्रम सुरू असतात.