ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारण्यास ‘सेबी’ने मनाई केल्यानंतरही अनेकांकडून ठेवी घेणारा आणि उस्मानाबाद पोलिसांना फसवणुकीच्या गुन्ह्य़ात हवा असलेला फरार आरोपी समृद्ध जीवन कंपनीचा सर्वेसर्वा महेश मोतेवार याला उस्मानाबाद पोलिसांनी पुण्यातून अटक केली. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मोतेवार याला सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते. संगम पुलानजीक असलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात मोतेवार आल्यानंतर त्याला उस्मानाबाद पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. पोलिसांचे पथक त्याला घेऊन उस्मानाबादला रवाना झाले.
उस्मानाबाद येथील मुरूम पोलीस ठाण्यात मोतेवार याच्याविरुद्ध २०१२ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्य़ात उस्मानाबाद न्यायालयाने त्याला २०१३ मध्ये फरार घोषित केले होते. त्यानंतर सेबीने र्निबध घातल्यानंतर ठेवीदारांकडून ठेवी स्वीकारल्याप्रकरणी मोतेवार याच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. यात सेबीच्या अधिकाऱ्यांनीच स्वत: फिर्याद दिली आहे. गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी मोतेवारविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
मोतेवार याच्यावर असलेल्या विविध गुन्ह्य़ांच्या चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याला सोमवारी चौकशीसाठी बोलाविले होते. त्याचवेळी उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांच्या आदेशानुसार उस्मानाबाद पोलिसांचे एक पथक आर्थिक गुन्हे शाखेच्या संगम पुलाजवळील कार्यालयात दाखल झाले. पुणे पोलिसांकडून चौकशी झाल्यानंतर उस्मानाबाद पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हे पथक मोतेवारला घेऊन दुपारी उस्मानाबादला रवाना झाले. रात्री त्याला या गुन्ह्य़ात अटक केली जाईल, असे पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी स्पष्ट केले.
मोतेवारच्या फसवणुकीचे महाजाल  
समृद्ध जीवनचा संचालक महेश मोतेवार याने गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांकडून पैसे गोळा केले. सेबीने त्याच्या कंपनीवर र्निबध घातल्यानंतरही त्याने ठेवी स्वीकारल्या होत्या. मोतेवार याच्यासह वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल, राजेंद्र भंडारे यांच्याविरुद्ध पुण्यातील डेक्कन आणि चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते. सेबीचे सहाय्यक महाव्यवस्थापक सचिन सोनावणे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. शिवचंद्र रेवते आणि तात्यासाहेब शिवगौंडा हे येनगुर येथील रेवते अॅग्रो कंपनीचे भागीदार होते. त्यांच्यात काही कारणांवरून वाद झाले होते. रेवते यांनी ही कंपनी मोतेवार याला ८५ लाख रुपयांना विकली होती. त्यामुळे शिवगौंडा यांनी फसवणुकीची तक्रार उस्मानाबाद पोलिसांकडे दिली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा