जेजुरी : साऱ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि अश्वाचा गाभारा सोमवारपासून (२८ ऑगस्ट) दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिना बंद राहणार आहे. या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार असून या दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. गडावर कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही. ५ ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरुस्तीचे काम चालेल, अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेजुरीचा ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू असून पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या दुरुस्त्या आणि उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी सुमारे १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला असून गडावर विविध विकासकामे वेगात सुरू आहेत. खंडोबा देवस्थानच्या कार्यालयात मंदिरातील विकास कामांच्या नियोजनासंदर्भात पुजारी, सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी- मानकरी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य विश्वस्त पोपटराव  खोमणे, ॲड. पांडुरंग थोरवे, डॉ राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे, ॲड. विश्वास पानसे, अभिजित देवकाते व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे: तीन वर्षांच्या चिमुकलीचे केस ओढले, गालाला चिमटे; शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल!

मुख्य गाभाऱ्याचे काम सुरू असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत. आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करून द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार  नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. मात्र, इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही, असे विश्वस्त मंडळाने स्पष्ट केले. पुजारी, सेवक आणि भाविकांची सोय बघूनच विकास कामे केली जात आहेत. खंडोबा गडाचे संवर्धन करण्यासाठी करण्यात येत असलेल्या विकास कामांना सहकार्य करण्याचे आवाहन या वेळी विश्वस्त मंडळाने केले.

या बैठकीसाठी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई, महेश जेजुरीकर, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, छबन कुदळे, कृष्णा कुदळे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, पंकज निकुडे, नितीन राऊत, प्रकाश खाडे, माधव बारभाई, समीर मोरे यांच्यासह पुजारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकास कामे व्यवस्थित पार पाडण्यासाठी पुजारी, सेवक, नित्य वारकरी आणि विश्वस्त मंडळाची समिती तयार करण्यात आली आहे.  

हेही वाचा – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदी डॉ. पराग काळकर यांची नियुक्ती

खंडोबा गडाला जुने वैभव प्राप्त होणार

दैवत, गडामधील मूळ लिंग असलेले खंडोबाचे मंदिर हे आठव्या शतकातील असल्याचा उल्लेख आहे. तर, खंडोबाची उंच दगडी तटबंदी, बाहेरील ओवऱ्या, दीपमाळा यांचे बांधकाम इसवी सन १६३७,  १७१२ आणि १७४२ मध्ये मराठा सरदारांनी केले. गडावर पूर्वी साडेतीनशे दीपमाळा होत्या असा उल्लेख आहे. काळाच्या ओघात १४२ राहिल्या आहेत. अनेक दीपमाळा पडझडीमुळे गेल्या, मात्र आता पुरातत्त्व खात्याने या गडाच्या संवर्धनाचे काम हाती घेतल्याने या गडाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार आहे.  जुन्या ऐतिहासिक स्वरुपात पुन्हा मोठ्या डौलाने खंडोबा गड मराठेशाहीच्या इतिहासाची साक्ष देणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanctum of khandoba temple of jejuri will be closed for darshan for one and a half month from monday pune print news vvk 10 ssb