इंदापूर : स्थलांतरित पक्ष्यांचे ‘माहेरघर’ आणि नानाविध प्रकारच्या देशी-विदेशी पक्ष्यांची ‘पंढरी’ अशी ओळख असलेल्या उजनी धरणाच्या जलाशयात कोट्यवधी रुपये किंमतीचे काळे सोने म्हणून परिचित असलेल्या वाळू तस्करांचा धुडगूस सुरू आहे. वाळूमाफियांकडून रात्रंदिवस उजनीतील पक्ष्यांच्या अधिवासाला बाधा पोहोचवित बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफियांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली असून पोलीस आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त कारवाईत इंदापूर तालुक्यातील कांदलगावपासून करमाळा तालुक्याच्या हद्दीपर्यंत वाळू तस्कारांचा पाठलाग करून सहा बोटी जप्त केल्या आहेत.
हेही वाचा >>> मक्तेदारी मोडीत काढून टाकण्यासाठी महारेराने घेतला मोठा निर्णय
उजनी जलाशयात यापूर्वीही अशी कारवाई करत वाळूमाफियांच्या बोटी जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, वाळूच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची माया गोळा केलेले माफिया पुन्हा मोठमोठ्या बोटी आणि तस्करीसाठी लागणारे साहित्य घेऊन रातोरात वाळू उपसा करत आहेत. तशा तक्रारीही स्थानिक नागरिकांकडून सातत्याने करण्यात आल्या आहेत. रात्री आणि दिवसाही हा वाळू उपसा सुरू असून वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर दंड भरून वाहने सोडविली जातात आणि पुन्हा वाळू उपसा केला जातो. त्यातून राज्य शासनाचा महसूल बुडण्याबरोबरच पर्यावरणाचीही हानी होत आहे. उजनी जलाशयात आलेल्या अनेक देशविदेशातील पक्ष्यांनाही त्याचा त्रास होत असून वाळू उपसा आणि बोटीमुळे अनेक पक्ष्यांना प्राण गमवावा लागला आहे. इंदापूरचे निवासी उपविभागीय आयुक्त वैभव नावडकर, तहसीलदार जीवन बनसोडे, नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, इंदापूर मंडळ अधिकारी श्याम झोडगे, माळवाडी मंडळ अधिकारी औदुंबर शिंदे, ग्राम महसूल अधिकारी अशोक पोळ यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.