पुणे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या कार्यालयासमोरील चंदनाची झाडे चोरून नेण्याचा प्रयत्न मंगळवारी पहाटे चोरटय़ांनी केला.
पुणे विद्यापीठाच्या आवारात चंदनाची अनेक झाडे आहेत. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोरील भागात आणि मागेही चंदनाची झाडे होती. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास चोरटय़ांनी दोन झाडे तोडली. यातील एक झाड हे सुरक्षा विभागाच्या कार्यालयासमोरीलच आहे. झाडांची चोरी झाली नसून ती फक्त पाडण्यात आल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, सकाळी फक्त एकच झाड आवारात पडलेले होते.
याबाबत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले, ‘पहाटे झाडे तोडण्याचा आवाज आल्यानंतर विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक चोरटय़ांना पकडण्यासाठी धावले. त्या वेळी चोरटय़ांनी सुरक्षा रक्षकांवर चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चोरटय़ांना पकडता आले नाही. मात्र, विद्यापीठाचा सुरक्षा विभाग योग्यप्रकारे काम करत आहे. विद्यापीठाचे आवार मोठे आहे. या आवाराची सुरक्षा उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाच्या आधारे सांभाळावी लागत आहे. याबाबत उपाय योजण्यात येतील. या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा