लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : विधी महाविद्यालय रस्त्यावरील एका सोसायटीच्या आवारातून चोरट्यांनी चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मंजुषा मकरंद शेटे (वय ५७, रा. छाया सोसायटी, भक्ती मार्ग, विधी महाविद्यालय रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
विधी महाविद्यालय रस्ता परिसरात असलेल्या छाया सोसायटीत चोरटे शनिवारी मध्यरात्री शिरले. चोरट्यांनी सोसायटीच्या आवारातील चंदनाचे झाड कटरचा वापर करून कापून नेले. चंदनाचे झाड कापून नेण्यात आल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस हवालदार चांदणे तपास करत आहेत.
आणखी वाचा-भूतकाळाच्या चष्म्यातून… काँग्रेस : तेव्हाची आणि आताची
शहरातील सोसायटी, शासकीय कार्यालय, शैक्षणिक संस्थांच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मुकुंदनगर, मार्केट यार्ड, तसेच प्रभात रस्त्यावरील एका सोसायटीत शिरुन चोरट्यांनी चंदनाची झाडे कापून नेली होती. प्रभात रस्त्यावरील बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी वकील महिलेला शस्त्राचा धाक दाखवून चंदनाचे झाड कापून नेल्याची घटना घडली होती. खडकीतील दारुगोळा कारखान्याच्या आवारातून चंदनाचे झाड कापून नेण्यात आले होते. चंदन चोरीच्या घटना वाढत असून, चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.