साताऱ्याच्या चिमणगावातील संदीप जाधव यांनी राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सलग दुसऱ्यांदा बाजी मारली आहे. यावर्षी ते राज्यात दुसरे आले असून उपजिल्हानिबंधक पदावर त्योची निवड झाली आहे. गेल्यावर्षी सहायक विक्रीकर आयुक्त या पदासाठी राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून त्यांची निवड झाली होती.
जाधव सध्या वित्त मंत्रालयामध्ये सहायक या पदावर कार्यरत आहेत. यावर्षी राज्यसेवा परीक्षेमध्ये त्यांना दुसरा क्रमांक मिळाला आहे. साताऱ्यातील चिमणगाव येथेच संदीप यांचे शिक्षण झाले. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील टाटा मोटर्समध्ये शिकाऊ कामगार म्हणून काम सुरू केले. बाहेरून अर्थशास्त्रामध्ये बी.ए. आणि त्यानंतर मेकॅनिक इंजिनिअरिंगचा पदविका अभ्यासक्रम दुरस्थ पद्धतीने पूर्ण केला. गेल्यावर्षीही राज्यसेवा परीक्षेमधून सहायक विक्रीकर आयुक्त या पदासाठी त्यांची निवड झाली होती.
जाधव यांनी सांगितले,‘‘गेल्या वर्षीही ‘अ’ वर्गाच्याच पदासाठी निवड होऊनही लोकांमध्ये काम करता यावे यासाठी उपजिल्हा निबंधक पदासाठी पुन्हा परीक्षा दिली. राज्यसेवा परीक्षेची मी गेली चार वर्षे तयारी करत आहे. मात्र, नोकरी करत असल्यामुळे कोणत्याही क्लासला नियमित जाणे शक्य नव्हते. त्यामुळे परीक्षेची तयारी माझी मीच केली.’’

Story img Loader