‘इर्शाद’ या शब्दावर आक्षेप घेत कवी संदीप खरे आणि वैभव जोशी यांच्या कार्यक्रमाला विरोध केला जाऊ लागला होता. त्यापाठोपाठ कार्यक्रमाचं नाव बदलून ‘काव्य पहाट’ केल्याची जाहिरात देखील सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली. मात्र, असा काही निर्णय झालेला नसून इर्शाद नावानेच यापुढे कार्यक्रम होणार असल्याचं आता खुद्द संदीप खरे यांनीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पुण्यामध्ये दिवाळी पहाटच्या कार्यक्रमामध्ये ‘इर्शाद’ हा संदीप खरे आणि वैभव जोशी यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम देखील रद्द झाला असल्याचं संदीप खरे यांनी सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय आहे प्रकरण?

संदीप खरे आणि वैभव जोशी हे ‘इर्शाद’ हा कवितांचा कार्यक्रम सादर करतात. करोना काळातील निर्बंध शिथिल केल्यानंतर राज्य सरकारने दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे पुण्यातील आयोजकांनी या कार्यक्रमाचं दिवाळी पहाटच्या निमित्ताने आयोजन केलं. मात्र, त्याच्या इर्शाद या नावावर आक्षेप घेतला गेला. सोशल मीडियावर त्यावरून चर्चा सुरू झाली.

गेल्या ५ वर्षांपासून सादर होतो ‘इर्शाद’!

दरम्यान, यावरून वाद सुरू झाल्यानंतर कार्यक्रमाचं नाव बदलल्याची पोस्ट व्हायरल होऊ लागली होती. पण कार्यक्रमाचं नाव बदललेलं नसल्याचं स्पष्ट करणारी एक फेसबुक पोस्ट संदीप खरे यांनी टाकली आहे. या पोस्टमध्ये गेल्या ५ वर्षांपासून इर्शाद हा कार्यक्रम भारतात आणि भारताबाहेरही सादर होत असल्याचं संदीप खरे यांनी सांगितलं आहे.

…म्हणून कार्यक्रमाचं नाव इर्शाद!

दरम्यान, या कार्यक्रमाचं नाव इर्शाद का ठेवण्यात आलंय, याविषयी देखील त्यांनी या पोस्टमध्ये सांगितलं आहे. “कुठल्याही निमित्ताने नव्हे तर प्रामुख्याने मराठी कवितांसोबतच हिंदी, उर्दू कविताही यात सादर होत असल्याने, काव्यमैफिलीला समर्पक अशा ‘इर्शाद’ या शीर्षकानेच भविष्यातही हा कार्यक्रम करावयाची इच्छा आहे”, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कार्यक्रम रद्द होऊनही जाहिरात आली कशी?

दरम्यान, ही जाहिरात आयोजक किंवा खुद्द संदीप खरे यांच्यापैकी कुणीही दिलेली नाही. त्यामुळे नाव बदललेली जाहिरात व्हायरल झाली कशी? यावर त्यांनी पोस्टमध्ये आश्चर्य व्यक्त केलं आहे. “५ नोव्हेंबर २०२१ च्या कार्यक्रमाविषयी सांगायचे तर विचारांती नाव न बदलण्याचे ठरल्यावर हा कार्यक्रम आणि त्या नुसार साहजिकच पुढील जाहिरात रद्द करावी असे ठरले. त्या प्रमाणे वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी जाहिरात आली देखील नाही. मात्र, बदललेल्या नावासह सोशल मीडिया वर प्रसिध्द झालेली जाहिरात ही मुळात कशी आली व कुणी केली हा आम्हालाही पडलेला प्रश्न आहे”, असं या पोस्टमध्ये संदीप खरे यांनी नमूद केलं आहे.

ती ऑफिशियल जाहिरात नाही!

“ती सर्वसंमतीने झालेली ऑफिशियल जाहिरात नाही, याची कृपया नोंद घ्यावी. या साऱ्या पार्श्वभूमीवर, ५ नोव्हेंबर २०२१चा कार्यक्रम दुर्दैवाने रद्द झाला आहे”, असं या पोस्टमध्ये संदीप खरे यांनी जाहीर केलं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sandip khare program in pune irshaad canceled clears on facebook post pmw