सातव्या दिवशी विसर्जनाची परंपरा असलेल्या सांगवी तसेच नव्या सांगवीतील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांच्या गणपतीला बुधवारी निरोप देण्यात आला. आकर्षक व भव्य मिरवणुका तसेच ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात जवळपास ११० मंडळांनी गणेशाचे विसर्जन केले.
पुण्यातील गणपती पाहता यावेत म्हणून अनंत चतुर्दशीच्या पूर्वीच म्हणजे सातव्या दिवशी विसर्जन करण्याची सांगवीकरांची परंपरा आहे. त्या दृष्टीने पहिल्या दिवसापासून मंडळांचे देखावे तयार असतात. बुधवारी सकाळपासून सांगवीतील घाटावर विर्सजनाला सुरुवात झाली. प्रारंभी घरगुती गणपतींचे विसर्जन झाले. तर, सायंकाळी चारपासून मंडळांच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. बहुतांश मंडळांनी डीजे तसेच ढोल-ताशा पथकांचा समावेश मिरवणुकीत केला होता. फेटे घातलेले तरुण व नऊवारी नेसलेल्या महिला, हे चित्र अनेक मंडळांमध्ये होते. रथांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई, डीजेचा दणदणाट, फुलांची सजावट, शालेय लेझीम पथके तसेच वारकरी पथके ही सांगवीतील मिरवणुकांची वैशिष्टय़े होती. विविध संस्थांकडून स्वागत कक्ष उभारण्यात आले होते. विसर्जन मार्गावर नेहमीपेक्षा जास्त वर्दळ असल्याने वाहतूक संथ झाली होती. रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप नौकुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रात्रीपासूनच प्रतिबंधात्मक कारवाई केली होती.