लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : चित्रपटेतर संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांना ‘संगीत रत्न’ हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

मराठी संगीताचा समृद्ध वारसा साजरा करण्याच्या उद्देशाने संगीतकार अजय नाईक यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र कलामंच आणि जस्ट कोलॅब यांच्या वतीने रविवारी (९ मार्च) कर्नाटक हायस्कूलच्या शकुंतला शेट्टी सभागृहात सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या ‘मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स’ सोहळ्यात सांस्कृतिकमंत्री आशिष शेलार आणि आमदार प्रसाद लाड यांच्या हस्ते पत्की यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

याच कार्यक्रमात प्रसिद्ध गायक-संगीतकार अवधूत गुप्ते, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर यांना मराठी इंडी म्युझिक आयकॉन पुरस्काराने तर रघुनंदन पणशीकर, आनंद भाटे आणि संजीव अभ्यंकर यांना शास्त्रीय संगीत विभागात सर्वोत्कृष्ट गायक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पहिले आयकॉनिक मराठी इंडी साँग म्हणून ‘गारवा’ या गाण्यासाठी कवी सौमित्र आणि संगीतकार मिलिंद इंगळे यांचा, पहिला आयकॉनिक इंडी मराठी कार्यक्रम म्हणून ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमासाठी संगीतकार-गायक जोडी सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा सन्मान होणार आहे. विटा (जि. सांगली) जिल्ह्यातील गायक अर्जुन वाघमोडे यांना अपंग विभागातील पुरस्काराने गौरविले जाईल, असे नाईक यांनी सांगितले.

Story img Loader