पुणे : शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तपासणी ‘रोबो’च्या माध्यमातून करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सांगली-कुपवाड महापालिकेकडून पहिल्यांदा अशी तपासणी करण्यात आली होती. हा प्रयोग पुण्यात राबविण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे.शहरातील मध्यवर्ती भागांमध्ये अनेक जुन्या जलवाहिन्या आहेत. त्यांची फारशी माहिती महापालिकेला नाही. या वाहिन्या जीर्ण झाल्याने त्यात गळती होते. यामध्ये नक्की काय दोष आहे, यासाठी महापालिकेला संपूर्ण रस्ता खोदावा लागतो. यामुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागतो.
या नवीन तंत्रज्ञानामुळे रोबोवर अत्याधुनिक कॅमेरे असणार आहेत. यामुळे जलवाहिनीमध्ये होणारी गळती, अनधिकृत, अधिकृत नळजोड, जलवाहिनी आतमध्ये खराब झाली आहे का, याची संपूर्ण माहिती पाणीपुरवठा विभागाला मिळणार आहे. शहरातील १०० मिलीमीटर व्यासापेक्षा मोठ्या आकाराच्या जलवाहिन्यांची तपासणी या माध्यमातून होणार आहे. शहरातील अनेक जलवाहिन्या ४० वर्षे जुन्या आहेत. त्या आतमध्ये सडल्याने फुटतात. त्यामध्ये दूषित पाणी, कचरा मिसळतो. वारंवार दुरुस्तीनंतरही अनेक जलवाहिन्यांमध्ये गळती थांबत नाही. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याची मागणी केली जात होती. सांगली कुपवाड महापालिकेकडून अशा प्रकारे जलवाहिनी तपासणी केली जात असल्याचेही समोर आल्यानंतर पुणे महापालिकेने प्रायोगिक तत्त्वावर या रोबोचा वापर सुरू केला आहे.
पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले की, रोबोच्या माध्यमातून जलवाहिन्यांची अंतर्गत तपासणी केली जाते. त्याचे फोटो, व्हिडिओ उपलब्ध होतात. सध्या दोन ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात ही तपासणी केली जात आहे. रोबोची कायमस्वरूपी खरेदी किंवा भाडेतत्त्वावर वापर याचा निर्णय घेतला जाईल.
अशी होते तपासणी
या यंत्रणेमार्फत सध्या कसबा पेठ, वडगाव भागातील जलवाहिन्यांची तपासणी केली जात आहे. जलवाहिनीला मध्यभागी छेद घेऊन त्यामध्ये रोबोट सोडला जातो. जलवाहिनीच्या आतमध्ये दोन्ही बाजूंना सुमारे १८० मीटर लांबीपर्यंत हा रोबो जातो. यामध्ये प्रकाशासाठी सुविधा, ३६० अंशात फिरणारा कॅमेरा लावलेला असतो. यामधून आवश्यकतेनुसार चित्रीकरण केले जाते, फोटो काढले जातात.
दोन भागात काम सुरू
जुन्या जलवाहिन्यांची रोबोटच्या साह्याने तपासणी करण्याचे काम सध्या शहरातील दोन भागात सुरू आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या कामाचे सकारात्मक निकाल महापालिकेला मिळत आहे. त्यामुळे याच माध्यमातून जलवाहिन्या दुरुस्त करण्याचा महापालिकेचा प्रयत्न राहणार आहे. रोबोटच्या वापरामुळे जलवाहिन्या होताना होणारा त्रासही कमी होणार आहे.