पुणे : सांगली जिल्ह्यातील वायफळे गावात दोन दिवसांपूर्वी एकाचा खून करून पसार झालेल्या आरोपीला पुणे पाेलिसांची गुन्हे शाखा आणि सांगली पोलिसांच्या पथकाने खेड शिवापूर परिसरातून अटक केली. आरोपीला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
विशाल सज्जन फाळके (वय ३२, रा. आंबेगाव खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. फाळके हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध सांगलीतील तासगावसह पुणे शहरातील सिंहगड रस्ता, वारजे, बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहे. दोन दिवसांपुर्वी सांगलीतील वायफळे गावात पूर्ववैमनस्यातून रोहित संजय फाळके याचा खून करण्यात आला हाेता. याप्रकरणी सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुख्य आरोपी विशाल फाळके पुण्यात पसार झाल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाली होती. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पुणे पोलिसांच्या गु्न्हे शाखेकडून फाळकेचा शोध घेण्यात येत होता.
हेही वाचा : मुख्यमंत्री झाल्यावर फडणवीस पहिल्यांदाच पुण्यात; म्हणाले, ‘मी पुन्हा येईन….’
फाळके खेड शिवापूर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. फाळकेला सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा यनिनिट दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, सहायक निरीक्षक अशिष कवठेकर, अमोल रसाळ, उज्वल मोकाशी, शंकर कुंभार, संजय जाधव, शंकर नेवसे, नागनाथ राख यांनी ही कामगिरी केली.