सांगली लोकसभा मतदारसंघाच्या यादीतील जी एक लाख आठ हजार वादग्रस्त नावे पुण्याच्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत, त्या मतदारांना पुण्यात मतदान करताना पुण्यातील रहिवासाचा पक्का पुरावा सादर करावा लागेल. तसेच ही नावे वादग्रस्त यादी म्हणून वेगळी ठेवली जातील, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.
पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रत्येकी १७ हजार ५०० याप्रमाणे सांगलीतील मतदारांची नावे घुसवण्यात आल्याची तक्रार माधव भंडारी आणि अ‍ॅड. विनायक अभ्यंकर यांनी निवडणूक उपमहानिरीक्षक आणि महाराष्ट्राचे निरीक्षक सुधीर त्रिपाठी यांची दिल्लीत भेट घेऊन त्यांच्याकडे केली.
त्याबाबत माहिती देताना भंडारी म्हणाले, की ही दुहेरी यादी आम्ही सादर केल्यानंतर त्रिपाठी यांनी या प्रकाराच्या चौकशीची तयारी दर्शवली. मतदारयादीत नाव असल्यामुळे या मतदारांना पुण्यात मतदानापासून रोखता येणार नाही. मात्र, त्यांना मतदान करताना पुण्यातील रहिवासाचा पक्का पुरावा सादर करावा लागेल आणि तशी तरतूद कायद्यातच आहे. रहिवासाचा पुरावा देताना त्यांना रजिस्टर्ड कागदपत्र सादर करावी लागतील. तसेच ही नावे वादग्रस्त यादी म्हणून प्रत्येक केंद्र अधिकाऱ्याकडे द्यावीत व त्याने संबंधित यादीतील मतदाराच्या पुराव्याची शहानिशा करावी, ही मागणी देखील मान्य करण्यात आली आहे.
यासंबंधीची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करूनही त्यांनी या प्रकरणाला जाणीवपूर्वक महत्त्व दिले नाही. कारण त्यांच्याच यंत्रणेने ही नावे यादीत समाविष्ट केली आहेत. त्यामुळेच आम्हाला केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांकडे जावे लागले.
कायद्यात नसलेली कलमे लावली
मोदी यांच्या थ्रीडी सभेसाठी तयार करण्यात आलेले तीन रथ शिरूर जवळ १० एप्रिल रोजी अडवण्यात आले असून निवडणूक भरारी पथकाने कायद्यात नसलेली कलमे लावून हे रथ थांबवले असल्याचीही तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्याचे अ‍ॅड. नंदू फडके यांनी सांगितले. या प्रकरणी न्यायालयातही दाद मागितली जाणार आहे. पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह अ‍ॅक्ट आणि मोटार व्हेइकल अ‍ॅक्टमध्ये नसलेली कलमे लावून हे रथ ताब्यात घेण्यात आले आहेत. संबंधित पोलीस अधिकारी आणि निवडणूक यंत्रणा यांच्या संगनमताने हा प्रकार करण्यात आला आल्याचेही फडके यांनी सांगितले.

Story img Loader