पिंपरी : पिशवीत काय आहे असे विचारताच झाडाझुडपात पळून जाणाऱ्या सराइत गुन्हेगाराला सांगवी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. आरोपीकडून दोन पिस्तुल जप्त केले आहेत.
राम परशुराम पाटील (वय २९, रा. जय मल्हार कॉलनी, थेरगाव) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. त्याच्या विरोधात वाकड, देहूरोड, हिंजवडी, रावेत, सांगवी, खडकी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
शहरामध्ये बेकायदेशीररित्या शस्त्र बाळगणारे आणि गोहत्या करणाऱ्या गुन्हेगारांचा पोलीस शोध घेत होते. सांगवी पोलीस पेट्रोलिंग करत असताना आरोपी रक्षक चौकातून पायी जाताना पोलिसांना दिसला. त्याच्याकडे काळ्या रंगाची पिशवी होती. पोलिसांनी पिशवीत काय आहे असे विचारताच आरोपी राम हा झाडाझुडुपांमध्ये पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.
हेही वाचा – पुणे : रेल्वे सुरक्षिततेसाठी प्रसंगावधान दाखवणाऱ्यांचा गौरव
पिशवीत काय आहे याबाबत पुन्हा विचारले असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. पंचांना बोलावून पिशवीची झडती घेतली असता त्यात दोन पिस्तुल, चार जिवंत पितळी (राऊंड) सापडले. आरोपी राम याने रावेत हद्दीत सोनसाखळी चोरल्याची कबुली दिली. तो सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध नऊ गुन्हे दाखल आहेत. सांगवी पोलीस तपास करत आहेत.