पिंपरी : सांगवीतील दोन वर्षीय रायाजी घारे याने सतरा दिवसांत राज्यातील सर्वांत उंच किल्ला साल्हेर आणि कळसूबाई शिखरावर यशस्वी चढाई केली आहे. त्याच्या कळसूबाई शिखरावरील चढाईची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.
रायाजी याने पालकांसोबत अकरा जानेवारीला राज्यातील सर्वांत उंच किल्ला साल्हेर सर केला. हा किल्ला नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यातील डोलाबारी डोंगररांगेत आहे. समुद्रसपाटीपासून एक हजार ५६७ मीटर उंचीवर असणारा किल्ला चढायला रायाजीने सकाळी सात वाजता सुरुवात केली. साडेचार तासांमध्ये हा किल्ला त्याने सर केला. त्यानंतर १५ दिवसांनंतर कळसूबाई शिखरावर त्याने यशस्वी चढाई केली. रायाजी याने दोन मार्चला गुजरातमधील गिरनार गुरू शिखर पर्वतावर चढाई केली. या शिखराची उंची तीन हजार ७५७ फूट असून, त्याने पाच तास नऊ मिनिटांमध्ये हे शिखर सर केले.
साल्हेर किल्ल्यावर चढाई केल्यानंतर ५० दिवसांमध्येच रायाजीने कळसूबाई शिखर व गिरनार गुरू शिखर पर्वतावरील मोहीम फत्ते केली आहे. ५० दिवसांमध्ये तीन मोहिमा यशस्वीपणे पूर्ण करणारा तो सर्वांत लहान मुलगा आहे. त्याचीही नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे रायाजीचे वडील सुधीर घारे यांनी सांगितले. रायाजीने त्याच्या गडकोट मोहिमेची सुरुवात एक वर्ष आठ महिने असताना दुर्गदुर्गेश्वर रायगडापासून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी सुरू केली. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील ३५० हून अधिक गडकिल्ले पाहण्याचे आणि अनुभवायचे स्वप्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
रायाजीने त्याच्या गडकोट मोहिमेची सुरुवात एक वर्ष आठ महिन्याचा असताना सुरु केली. यामध्ये रायाजीची बहिण श्रीजा जीचे वय ११ वर्ष आहे, ती सुद्धा त्याच्या सोबत मोहीमेत त्याला साथ देत आहे. त्याच्या आई-वडिलांना किल्ल्यावर भटकंती करण्याचा छंद आहे. त्यामुळे रायाजीला गड किल्ल्याविषयी माहिती मिळाली. किल्ल्यावर, गडावर फिरायला जायचे म्हटले की तो लगेच तयार असे त्याचे वडील सुधीर घारे यांनी सांगितले.
३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले स्वराज उभारणीसाठी तयार केले. त्यातील बरेच गडकिल्ले सद्यस्थितीत शेवटच्या घटका किंवा श्वास घेत आहे. अजून ५० वर्षा नंतर ते असतील की नाही किंवा काय स्थिती असेल कोणाला माहीत नाही. जे काही संस्था गडकिल्ले संवर्धन करत आहे, त्यांना मिळणारी मदत किंवा कार्य खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व गडकिल्यांचे संवर्धन करावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.