ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता या ‘संहिता ते नाटय़प्रयोग’ हा कलाप्रवास शनिवारी (६ जुलै) उलगडणार आहेत. ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकासंदर्भात दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी यांच्याशी केलेल्या संवादातून साहित्यातील नाटय़बीजाचा प्रवास, त्यावरचे दिग्दर्शन, अभिनय, दृक-श्राव्यकला या संस्कारांवरील त्यांचे भाष्य ऐकण्याची संधी यानिमित्ताने युवा कलाकारांना उपलब्ध होत आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि भारती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने युवा साहित्य-नाटय़ संमेलनांतर्गत उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पौड रस्त्यावरील भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज सभागृह येथे सायंकाळी पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पूर्वार्धात ‘झिम्मा’ या विजया मेहता यांच्या आत्मकथनपर पुस्तकाला परिषदेचे अध्यक्ष डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांच्या हस्ते ‘लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तर, उत्तरार्धात विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या ‘हमीदाबाईची कोठी’ या नाटकावर आधारित लघुपट दाखविण्यात येणार असल्याची माहिती परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. ‘आशय सांस्कृतिक’ च्या सहकार्याने विजया मेहता यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या ठिकाणी हे प्रदर्शन खुले राहणार आहे. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनील महाजन आणि ‘आशय’ चे वीरेंद्र चित्राव या वेळी उपस्थित होते.
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता उलगडणार ‘संहिता ते नाटय़प्रयोग’ हा कलाप्रवास
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता या ‘संहिता ते नाटय़प्रयोग’ हा कलाप्रवास शनिवारी (६ जुलै) उलगडणार आहेत.
First published on: 30-06-2013 at 02:45 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanhita te natya prayog by vijaya mehta on 6th july