शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर स्त्रियांना मिळालेला प्रवेश हा स्त्री-पुरुष समानतेचा विजय असल्याची भावना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां विद्या बाळ यांनी गुरुवारी व्यक्त केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सव्वाशेव्या जयंतीवर्षांनिमित्त होणारा सन्मान मोलाचा असून मला कृतार्थ वाटत आहे. स्त्रियांनी आणि दलितांनी डॉ. आंबेडकरांचे ऋण मानले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण आणि आमदार जयदेव गायकवाड यांच्या हस्ते विद्या बाळ यांना महिला सामाजिक न्याय सन्मान प्रदान करण्यात आला. पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, माजी आमदार कमल ढोले-पाटील, स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, अशोक राठी, आनंद रिठे, वासंती काकडे आणि डॉ. दत्तात्रय गायकवाड या वेळी उपस्थित होते.
विद्या बाळ म्हणाल्या, शनिशिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे. न्यायालयात मान्यता मिळाली असली तरी मी ती हारच मानते. अजूनही पुरुषी मानसिकता बदलण्याची गरज आहे. स्त्रियांना प्रवेश मिळाल्यानंतर शंकराचार्यानी जी प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबाबत मी तीव्र नाराजी व्यक्त करते. समानता स्त्री-पुरुष दोघांनाही मिळाली पाहिजे. समानता प्रतिष्ठेची असते. तर, समता ही मूल्यांवर आधारित असते. देशात विविध पातळ्यांवर विषमता आहे. पण, स्त्री-पुरुष विषमता ही मूळ विषमता आहे. स्त्री-पुरुष समानतेची सुरुवात घरापासून झाली, तर समाजातील स्त्री-पुरुष विषमता दूर होण्यास मदत होईल.
डॉ. आंबेडकरांची घटना म्हणजे शांततामय क्रांती आहे, असे जयदेव गायकवाड यांनी सांगितले. देशाची घटना ही केवळ कायद्याची नाही तर, मानवतेची आणि समानतेची घटना आहे, असे वंदना चव्हाण यांनी सांगितले. पक्षातर्फे अवयवदान जनजागृती अभियानाचा प्रारंभ प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संजीव जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आला. झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशन सेंटरच्या आरती गोखले यांनी अवयवदानाविषयी माहिती दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा