डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने महापालिकेच्या सहकार्याने शहरातील ६० झोपडपट्ट्यांमध्ये रविवारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत साडेआठ किलोमीटरचा परिसर स्वच्छ करून १९२ टन कचऱ्याचे संकलन करण्यात आलं आहे. संकलित कचऱ्याच्या वाहतुकीसाठी महापालिकेकडून कचरा गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
कोथरूड, केळेवाडी मधील मोगल चौक ते एआरएआय कंपनी गेट, किष्किंधानगर, सुतारदरा मैदान, पर्वती टेकडी, पर्वती जनता वसाहत, चुनाभट्टी कॉर्नर, गोसावी वस्ती, वारजे, कर्वेनगर, जलशुद्धीकरण प्रकल्प, होम कॉलनी, वडारवाडी, खानवस्ती रोड, रामनगर, येरवडा, कळस, धानोरी येथील स्वीपर चाळ, भैयावाडी, मदारवस्ती, धनकवडी, राऊतबाग, कात्रज नवीन वसाहत, कात्रजतलाव, गुगळे प्लॉट आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
कोथरूडच्या सह पोलीस आयुक्त रख्मिणी गलांडे आणि महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उप आयुक्त आशा राऊत यांच्या हस्ते अभियानाला प्रारंभ झाला. माजी नगरसेविका दीपाली धुमाळ, बाबा धुमाळ, लघु निवंगुणे, महापालिकेच्या आरोग्य अधिकारी केतकी घाटगे यावेळी उपस्थित होते.
शहरातील विविध ठिकाणच्या ६० झोपडपट्ट्यामधील साडे आठ किलोमीटर परिसरात ४ हजार ४५४ स्वयंसेवकांमार्फत कचरा गोळा करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली. नगररस्ता, वडगांवशेरी, येरवडा-कळस-धानोरी, ढोले पाटील रस्ता, औंध-बाणेर, शिवाजीनगर-घोले रस्ता, कोथरूड-बावधन, धनकवडी-सहकारनगर, सिंहगड रस्ता, वारजे-कर्वेनगर, हडपसर-मुंढवा, वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत झोपडपट्यांमध्ये स्वच्छता करण्यात आली.