लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत केंद्र शासनाच्या पथकाकडून पिंपरी-चिंचवड शहरात पाहणी करण्यात येणार आहे. त्यात झोपडपट्टी, मंडई, बाजारपेठ, लोकवस्ती, मोशी कचरा डेपो, मैला सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृहे, रस्ते, दुभाजक, आरोग्य विभागाचे कामकाज आदींची पाहणी पथक करणार आहे.
दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्राच्या पथकाकडून फेब्रुवारीत पाहणी केली जाते. मात्र, यंदा जुलैअखेर केंद्राचे पथक शहरात पाहणीसाठी दाखल झाले आहे. शहरातील आठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील एक किंवा दोन भागांची पाहणी केली जाणार आहे. दाट लोकवस्ती, झोपडपट्टी, सार्वजनिक शौचालये, स्वच्छतागृह, रस्ते, दुभाजक, सुशोभीकरण, मंडई, बाजारपेठ, मोशी कचरा डेपो, सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आदींची पाहणी पथकाकडून केली जाणार आहे.
हेही वाचा… पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावर दोन ट्रकचा भीषण अपघात; तीन जण जखमी
तसेच महापालिकेचा आरोग्य विभाग, मोशी कचरा डेपो येथील व्यवस्थापन आणि कामकाजाचा आढावा घेतला जाणार असून, पथकातील सदस्य नागरिकांशीही संवाद साधणार आहेत.