मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याला विभागीय आयुक्तांनी पुन्हा तीस दिवसांची संचित रजा मंजूर केली. मुलीचे वैद्यकीय कारण देऊन त्याने या रजेसाठी जूनमध्ये अर्ज केला होता. रजेची मंजुरी मिळताच संजय दत्तला बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास कारागृहातून सोडण्यात आले. त्यानंतर तो मुंबईकडे रवाना झाला.
मुंबई बॉम्बस्फोटाच्या खटल्यास शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर मे २०१३ मध्ये संजय दत्तची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. ऑक्टोबर २०१३ मध्ये त्याला फलरे रजा मंजूर करण्यात आली होती. त्यात पुढे १४ दिवसांची वाढ करण्यात आली. जानेवारी २०१४ मध्ये त्याला तीस दिवसांची संचित रजा मंजूर झाली. ही रजाही साठ दिवसांपर्यंत वाढविण्यात आली होती. डिसेंबर २०१४ मध्ये १४ दिवसांची फलरे त्याला मिळाली. ही रजा वाढवून देण्यासाठीही त्याने प्रयत्न केले, मात्र त्यावर टीका झाल्याने ही मागणी मंजूर झाली नाही. संजय दत्तने आतापर्यंत १४६ दिवसांची रजा उपभोगली आहे. मुलीच्या नाकाची शस्त्रक्रिया करण्याचे कारण देऊन त्याने पुन्हा रजेसाठी अर्ज केला होता. या अर्जावर विभागीय आयुक्त चोक्किलगम यांनी दोन दिवसांपूर्वी निर्णय घेतला व रजा मंजूर केली. संजय दत्तने योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर बुधवारी दुपारी त्याला कारागृहातून सोडण्यात आल्याची माहिती कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी दिली.
पत्नी मान्यता व कधी मुलीवरील उपचाराचे कारण देऊन संजय दत्तकडून वेळोवेळी रजा घेतली जात असल्याने कारागृह प्रशासन त्याला झुकते माप देत असल्याची टीका सातत्याने करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा