ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख ‘चोरमंडळ’ असा केला होता. संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. विधानसभेतही यावरून मोठा गदारोळ झाल्याचं बघायला मिळालं. भाजपाच्या अनेक सदस्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्तावही आणला. दरम्यान, या विधानावर आता संजय राऊत यांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं आहे. पुण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुणे पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपावर टीकास्रही सोडलं.
हेही वाचा – संजय राऊत पुन्हा जेलमध्ये जाणार? ‘त्या’ प्रकरणावरून शिंदे गटातील आमदाराने दिला इशारा
काय म्हणाले संजय राऊत?
“मी विधिमंडळाचा पूर्णपणे आदर करतो. माझं ते विधान एका विशिष्ट गटासाठी होतं, हे सर्वांनाच माहिती आहे. शरद पवार यांनीही याबाबत भाष्य केलं आहे. विशिष्ट फुटीर गटाबाबत मी ते विधान केलं होते, असं तेही म्हणाले. मी विधिमंडळ आणि संसदेबाबत अशा प्रकारे बोलू शकत नाही, कारण मी त्या सभागृहाचा सदस्य आहे. कायदा, संविधान, घटना, नियम यांचं महत्त्व मला माहिती आहे”, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
हेही वाचा – “निवडणूक आयोग राजकीय मालकांसाठी काँट्रॅक्ट किलर पद्धतीने…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल!
“४० आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं”
दरम्यान, याप्रकरणी संजय राऊतांना हक्कभंगाची नोटीस देण्यात आली होती. मात्र, राऊतांनी अद्यापही त्यावर उत्तर न दिल्याने शिंदे गटाच्या आमदारांनी संजय राऊतांच्या अटकेची मागणी केली आहे. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “शिंदे गटाच्या आमदारांनी माझ्या अटकेची मागणी केली असेल, तर होऊन जाऊ द्या. कायदा, न्यायालय, पोलीस आणखी पूर्णपणे खोक्याखाली चिरडलेले नाहीत. अजूनही काही रामशास्री जीवंत आहेत. ४० आमदारांनी आधी स्वत:चं अंतरंग तपासावं. खरं तर करप्ट प्रॅक्टिसचा वापर केल्याबद्दल हे सर्व आमदार आत जायला पाहिजे”, असे ते म्हणाले.
हेही वाचा- “संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचा….” भरत गोगावले यांचा टोला
पुणे पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपावर टीकास्र
पुढे बोलताना त्यांनी पुण्यातील पोटनिवडणुकीच्या निकालावरून भाजपावर टीकास्र सोडलं. “पैसा आणि सत्तेचा गैरवापर होऊनसुद्धा पुण्यातल्या सुजान मतदारांनी सत्ताधाऱ्यांना जी चपराक लगावली आहे. यातून भाजपाने धडा घेतला पाहिजे. या निवडणुकीत पुणेकरांना विकत घेण्याचा प्रयत्न झाला, पण पुणेकर त्याला बळी पडले नाहीत. त्यासाठी पुणेकरांचं अभिनंदन केलंच पाहिजे. कसब्यात घराघरात पैशांची पाकीटं फेकण्यात आली. तरी सुद्धा लोकांनी ही धनशक्ती लाथाळली. मुळात ही आता सुरुवात आहे. कसबा तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, असे ते म्हणाले. तसेच महाविकास आघाडी एकत्र लढल्यास २०२४ मध्ये आमच्या २०० जागा निवडणूक येतील”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.