शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादावर भाष्य करताना थेट राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांना लक्ष्य केलंय. छगन भुजबळ यांनी नाशिकमधील वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, इतरांनी भाष्य करू नये असं म्हटल्याचं राऊतांच्या लक्षात आणून दिलं. त्यावर संजय राऊत यांनी छगन भुजबळ यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरत असल्याचं मत व्यक्त केलं. ते पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाने आयोजित केलेल्या व्याख्यानानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत होते.
संजय राऊत यांना आघाडीत सुरू असलेले पेल्यातील वादळं आघाडीला अडचणीत आणत आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर संजय राऊत म्हणाले, “नाशिकमधील छगन भुजबळ आणि सुहास कांदे वाद मिटेल. आम्ही काही पेल्याबिल्यात पित नाही. आमच्याकडे वाद नाही. आमच्याकडे पेल्यातील वादळं येत नाहीत, जी येतात ती मोठी येतात.”
“छगन भुजबळ यांच्यात ती रग अजूनही आहे”
“छगन भुजबळ महाविकासआघाडीचे सन्माननीय नेते, वरिष्ठ मंत्री आहेत. कधीकाळी ते शिवसैनिक होते. त्यांच्या ती रग अजूनही आहे. सुहास कांदे यांच्यातही आमदार म्हणून तशी रग आहे. दोघांनीही एकमेकांचा सन्मान राखावा. एक आमदार आहेत आणि एक पालकमंत्री आहेत. त्यासाठी आम्ही एकमेकांशी बोलतो आहोत,” असं मत राऊतांनी व्यक्त केलं.
छगन भुजबळ यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे… : संजय राऊत
छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील असं सांगताना इतरांनी लक्ष घालू नये असं म्हटलं. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही कुठं लक्ष घालतो. त्यांना त्रास होतोय म्हणून ते इकडे तिकडे फिरतायेत. छगन भुजबळ यांच्याशी माझा चांगला संवाद आहे. तुम्ही नाशिकचा प्रश्न इथं का आणता? हे पुणे आहे, पुण्याविषयी बोला.”
“समीर वानखेडे चुकीचं वागतायेत की नाही असं मी म्हणणार नाही”
“समीर वानखेडे चुकीचं वागतायेत की नाही असं मी म्हणणार नाही. त्यासाठी तपास यंत्रणा काम करत आहे. मुंबईचे पोलीस तपास करत आहेत. नवाब मलिक यांनी जे पुरावे समोर आलेत ते खरे असतील तर ते प्रकरण गंभीर आहे इतकंच मी म्हणाले. या महाराष्ट्रात सर्व मराठी लोक आहेत. मात्र, आता जे चित्र दिसते आहेत ते एनसीबी विरुद्ध लढाई सुरू आहे. क्रांती रेडकर विरुद्ध नाही. आमच्या मराठी लोकांविरुद्ध कारवाई होते. अजित पवारांच्या बहिणी, भावना गवळी, अशोक चव्हाण यांचे नातेवाईक याच्यावर कारवाई केली जातेय. मग हे मराठी नाही का? मात्र हे वानखेडे प्रकरण गंभीर आहे,” असं संजय राऊत यांनी सांगितलं.
“२०२४ मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल”
“देशातली कोणतीही आघाडी काँग्रेसला सोडून होऊ शकत नाही. २०२४ मध्ये केंद्रातील चित्र नक्की बदलेल. महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढण्याची आमची इच्छा आहे. त्यासाठीच गेल्या २ दिवसांपासून मी काम करत आहे. उत्तर प्रदेशात आम्ही लहान आहोत, मात्र निवडणूक नक्की लढवू. देश फार मोठा आहे. यामध्ये अनेक राजकीय पक्ष आहेत. २०२४ मध्ये एकपक्षीय सरकार जाऊन आघाडी सरकार सत्तेवर येईल. उद्धव ठाकरे यांच्यामध्ये राष्ट्रीय नेतृत्व करण्याची ताकद आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.
हेही वाचा : “२०२४मध्ये शिवसेना केंद्रात…”, शिवसेनेच्या राष्ट्रीय राजकारणातील वाटचालीवर संजय राऊतांचं मोठं विधान!
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, “एसटी कर्मचारी मृत्यू हा महत्त्वाचा विषय आहे. एसटी कर्मचाऱ्यांचीही वकिली करायला हवी. आर्यन खानला सोडायला मोठमोठे वकील लागले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर मी वकील करेल. मुख्यमंत्री एसटी कर्मचारी प्रश्नावर गंभीर आहेत.”