राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक झालेले अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे. पुण्यात याबाबत बोलताना शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. इतरांवर गुन्हे सिद्ध का होत नाही हा संशोधनाचा विषय आहे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राणा दाम्पत्याविरोधात राजद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना नोंदवलं आहे. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणांना दिलेल्या जामीनाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. त्यात दिलेल्या माहितीनुसार पोलिसांच्या नोटीसनंतर राणा घराबाहेर पडले नाहीत. राणा दाम्पत्याना अटक होण्यापूर्वीच त्यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा वाचण्याचं आंदोलन मागे घेतलं होतं. त्यामुळे त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे, असं मत मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
याबाबत संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.“या राज्यामध्ये किंवा देशामध्ये जो दिलासा घोटाळा सुरु आहे आणि त्यामध्ये अनेक कांगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. बाकी इतरांवर ते सिद्ध का होत नाही हा फार मोठा संशोधनाचा विषय आहे,” असे संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, राणा दाम्पत्याने गेल्या महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत राणा दाम्पत्याने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर गुरुवारी त्यांची कारागृहातून सुटका करण्यात आली.