पुण्यातल्या जुन्या हॉटेलांची आठवण निघाली की हमखास चर्चा होते ती नूमवि प्रशालेशेजारच्या ‘संतोष भुवन’ या हॉटेलची. सहकुटुंब जाण्यासाठी पुण्यात तशी खूप कमी हॉटेल्स ज्या काळात होती, तो हा काळ. मसाला डोसा आणि इतर अनेक पदार्थासाठी ‘संतोष भुवन’ची पुण्यात ख्याती होती. कर्नाटकातून पुण्यात आलेल्या गिरिअप्पा मिजार यांनी हे हॉटेल १९३८ च्या दरम्यान सुरू केलं होतं. त्यांच्या हाताला चव होती आणि तीच चव मिजार यांच्या पुढच्या पिढय़ांमध्येही आली. मिजार यांची तिसरी पिढी आज हॉटेल व्यवसायात आहे. ‘संतोष भुवन’ काही कारणांनी बंद करून त्याच नावानं मिजार यांनी टिळक रस्त्यावर अभिनव महाविद्यालयाजवळ नव्यानं हॉटेल सुरू केलं. पुढे हे हॉटेल त्यांचे पुत्र घनश्याम ऊर्फ राजाभाऊ मिजार यांनी चालवलं. त्यातूनच त्यांनी याच जागेत ‘केदार भोजनालय’ हे घरगुती जेवण देणारं भोजनालय सुरू केलं. ‘संतोष भुवन’ एवढंच व्यावसायिक यश या भोजनालयानंही मिळवलं. या व्यवसायाचे संस्थापक घनश्याम यांच्या निधनानंतर राजाभाऊ मिजार यांनी टिळक रस्त्यावरच्याच जागेत ‘संजीविनी’ हे हॉटेल ४ फेब्रुवारी १९८५ मध्ये सुरू केलं. आज या हॉटेलची सफर करू या.

‘संजीविनी’मध्ये जायचं तर मिसळ खायलाच. मिसळीचा आब राखून पुण्यातले जे हॉटेल व्यावसायिक मिसळ देतात, त्यांच्यात ‘संजीविनी’ मिसळीचं नाव घ्यावं लागेल. मिसळीत अनेकविध पदार्थ वापरले तर तिची लज्जत वाढते. ‘संजीविनी’ मिसळमध्ये देखील विविध पदार्थ असतात. पोहे, भाजक्या पोह्य़ांचा चिवडा, मुगाची उसळ, बटाटा भाजी, शेव, कांदा, कोथिंबीर आणि ओलं खोबरं असे पदार्थ इथे मिसळीसाठी वापरले जातात. हे सर्व पदार्थ आणि त्याच्याबरोबर खास रस्सा किंवा सँपल आणि स्लाइस अशा पद्धतीची ही मिसळ खवय्यांच्या चांगलीच पसंतीला उतरते. मिसळीशिवाय इतरही अनेकविध पदार्थासाठी ‘संजीविनी’ प्रसिद्ध आहे. विशेषत: ऑर्डर दिल्यानंतर मगच तयार करून दिला जाणारा बटाटा वडा ही इथली खासियत. त्या बरोबरच दही मिसळ, मटार उसळ-स्लाइस, वडा सँपल, पाव पॅटीस हे पदार्थही इथे आवर्जून घ्यावेत असेच असतात. चहा, कॉफी, कोकम सरबत, सोलकढी, आलेपाक, लाडू यापैकी जे आवडेल तेही आपण घेऊ शकतो. गुरुवारी आणि शनिवारी इथे उपवासाची मिसळ मिळते. खिचडी, बटाटा भाजी, दाण्याची आमटी, बटाटा चिवडा आणि ओलं खोबरं वापरून उपवासाची मिसळ तयार केली जाते. जरा बदल म्हणून ही मिसळ खायलाही हरकत नाही.

राजाभाऊंचे पुत्र मनीष मिजार आणि सुनील मिजार हे दोघं मिळून आता संजीविनी स्नॅक्स कॉर्नर हे हॉटेल चालवतात. मनीष यांचं उच्च शिक्षण झालं आहे. मात्र मूळची पदार्थ बनवण्याची आवड त्यांच्यातही आहेच. घरच्या हॉटेल व्यवसात आई सरोजा आणि वडील राजाभाऊ यांनी केलेले संस्कार, त्यांनी घालून दिलेले व्यवसायाचे तसेच कष्टाचे धडे यामुळे नोकरीकडे न वळता मनीष यांनी घरचाच व्यवसाय पुढे सुरू ठेवला. आई-वडिलांनी या व्यवसायात जे नाव मिळवलं तो लौकिक आणखी वाढवायचा या भावनेतून मिजार भावंडं या व्यवसायाकडे पाहतात. सुनील मिजार आणि बहीण ऋजुता श्रोत्रिय यांचं पूर्ण सहकार्य आणि मोलाचं साहाय्य या व्यवसायात असतं. शिवाय मनीष यांची पत्नी मंजिरी या देखील ज्या ज्या वेळी गरज लागेल, त्या त्या वेळी व्यवसायाला आवश्यक ती सर्व मदत त्यांची नोकरी सांभाळून करतात.

मुळात आपल्या हॉटेलमध्ये जे पदार्थ तयार करायचे ते आपण स्वत: करायचे. त्याच्यासाठी दर्जेदार कच्चा माल वापरायचा. त्याची खरेदी आपण स्वत: करायची. ही कामं नोकरांवर किंवा पदार्थ तयार करण्याची कामं आचाऱ्यावर सोपवायची नाहीत. त्यामुळे प्रत्येक पदार्थाच्या दर्जावर, चवीवर आपलं लक्ष राहतं येणारा ग्राहकही त्यामुळे समाधानी राहतो, त्याला सातत्यानं एकच चव मिळते. ही वडिलांनी दिलेली शिकवण मनीष मिजार आचरणात आणतात. आई आणि वडील या दोघांनी हा व्यवसाय नावारूपाला आणण्यासाठी जे कष्ट घेतले ते मिजार भावंडांनी पाहिले आहेत. त्यामुळे नकळत तेच संस्कार सर्व भावंडांवर झाले. या संस्कारांचा फायदा त्यांना झाला तो असा, की स्वत: सर्व कामं करायची या वृत्तीमुळे मिसळीची किंवा बटाटा वडा, मटार उसळ यांची चव इथे वर्षांनुवर्षे कायम राहिली आणि हीच ‘संजीविनी’ची खायियत आहे.

कुठे आहे?

  • टिळक रस्त्यावर स्वारगेटकडे जाताना अभिनव महाविद्यालयाच्या अलिकडच्या चौकात
  • सकाळी साडेआठ ते सायंकाळी सात रविवारी दुपारी चापर्यंत आणि सोमवारी बंद

Story img Loader