लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर शिवसेनेच्या (ठाकरे) प्रभारी शहरप्रमुखपदी संजोग वाघेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी शहरप्रमुख, माजी नगरसेवक सचिन भोसले यांच्या जागी वाघेरे यांची नियुक्ती केली आहे.

संजोग वाघेरे हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदही भूषविले आहे. सर्वाधिक काळ म्हणजेच सहा वर्षे ते राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष होते. शहराचे महापौरदही त्यांनी भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अतिशय निकटवर्तीय अशी त्यांची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पवार यांची साथ सोडली. शिवसेना (ठाकरे) पक्षात प्रवेश केला. त्यांच्याकडे मावळच्या संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली. या पक्षाकडून त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढविली. त्यांनी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांना कडवी झुंज दिली. पण, अपयश आले.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्याने चलबिचल सुरू होती. वाघेरे पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी आपले चांगले संबंध आहेत. बोलणे होत असते. पण, स्वगृही परतण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे सांगून वाघेरे यांनी चर्चेला बळ दिले होते. या चर्चा सुरू झाल्यानंतर तातडीने पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन अहिर यांनी शहरात धाव घेतली. वाघेरे यांची भेट घेतली, चर्चा केली.

शिवसेनेचे विभागीय नेते, खासदार संजय राऊत यांनीही शहरात येऊन आढावा बैठक घेतली. त्यानंतर पक्ष संघटनेत बदल करण्यात आले आहेत. वाघेरे यांची प्रभारी शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पिंपरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असतानाही महाविकास आघाडीत संधी न मिळाल्याने माजी शहरप्रमुख, माजी नगरसेवक सचिन भोसले नाराज होते. त्यामुळे संघटनेच्या कार्यात सक्रिय दिसत नव्हते. त्यांच्या जागी वाघेरे यांची प्रभारी शहरप्रमुखपदी नियुक्ती केली आहे.

Story img Loader