पुणे : शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याप्रकरणी राज्य दहशतवादविरोधी पथकाकडून (एटीएस) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तेलंगण पोलिसांच्या ताब्यातून संजय दीपक राव (वय ६०) याला अटक करण्यात आली. ‘राव याने वेगवेगळ्या नावांचा वापर करून तेलंगण, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्रात माओवादी विचारधारेचा प्रसार केला असून, त्याचे डीएनए प्रोफाइलिंग करण्यास परवानगी मिळावी,’ अशी विनंती ‘एटीएस’ने विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुरुवारी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माओवादी चळवळीचा नेता कोनाथ मुरलीधरन ऊर्फ थॉमस (वय ६१, मूळ रा. कोची रिफायनरीजवळ, जि. एर्नाकुलम, केरळ ), तसेच साथीदार इस्माइल हमजा सीपी उर्फ जेम्स मॅथ्यू (रा. वाला रँड, पांडीकांड, जि. मलपूरम, केरळ) यांना एटीएसने ८ मे २०१५ रोजी अटक केली होती. तपासात दोघे जण बंदी घातलेल्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) संघटनेचे सदस्य असल्याचे उघड झाले. त्यांनी शहरी भागात माओवादी विचारधारेचा प्रसार केल्याचा आरोप होता. भूमिगत राहून ते काम करत होते. या प्रकरणात त्यांचा साथीदार संजय दीपक राव (वय ६०, रा. वसुंधरा बिल्डिंगजवळ, अंबरनाथ, जि. ठाणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. राव तेव्हापासून पसार होता. रावचे साथीदार कोनाथ आणि इस्माइल यांच्याविरुद्ध ‘एटीएस’ने १४ ऑक्टोबर २०१५ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर कोनाथ आणि इस्माइल यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.

हेही वाचा…पूजा खेडकर यांची केंद्राकडून चौकशी; एकसदस्यीय समितीची स्थापना, राज्याकडूनही अहवाल पाठविण्याची तयारी

राव फरार झाल्यानंतर भूमिगत राहून माओवादी विचारधारेचा प्रसार करत होता. त्याला गेल्या वर्षी तेलंगण पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याकडून रिव्हॉल्वर जप्त करण्यात आले होते. महाराष्ट्र ‘एटीएस’कडून दाखल गुन्ह्यात फरार असलेल्या रावला हैदराबाद येथील चेरालपल्ली कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर ‘एटीएस’ने त्याला अटक करून शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. ‘राव बंदी घातलेल्या माओवादी संघटनेचे काम भूमिगत राहून करत आहे. वेगवेगळ्या राज्यात तो बनावट नावांचा वापर करून वास्तव्य करत होता. त्याच्याकडून वेगवेगळी नावे असलेली आधारकार्ड जप्त करण्यात आली आहेत. त्याने शस्त्र चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. राव त्याची ओळख लपविण्यासाठी प्रयत्न करत असून, अशा परिस्थितीत त्याची डीएनए चाचणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घ्यावे लागणार आहेत,’ असे विशेष सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले. याबाबत एटीएसचे सहायक पोलीस आयुक्त सुभाष दुधगावकर यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

हेही वाचा…‘ससून’मुळे अधिवेशनात मंत्र्यांची कोंडी; रॅगिंगसह डॉक्टरांच्या मद्य पार्टीचे विधानसभेत पडसाद

राव याचे वकील ॲड. रोहन नहार आणि ॲड. पार्थ शहा यांनी राव याच्या डीएनए चाचणीस विरोध केला. एटीएसकडून दाखल केलेल्या अर्जावर १५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयाने राव याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjoy rao arrested by maharashtra ats accused of spreading maoist ideology in urban areas pune print news rbk 25 psg