दुष्काळग्रस्तांना ६० हजार किलो धान्यवाटप करण्याचा उपक्रम ‘श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठान’ तर्फे नुकताच राबविण्यात आला. शहरातील कोथरूड परिसरातील दानशूरांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे प्रतिष्ठानच्या संकल्पापेक्षाही अधिक धान्य बीड जिल्ह्य़ामधील दुष्काळग्रस्तांना वाटण्यात आले. ‘श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठान’ आणि ‘हिंदू गर्जना प्रतिष्ठान’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी वारजे, कर्वेनगर, कोथरूड, गणेशनगर या भागातील दानशूरांनी या मोहिमेत मोलाची कामगिरी बजावली.
तरुणाईपासून ज्येष्ठांपर्यंत अनेक राबलेल्या हातांमुळे २५ हजार किलो धान्य दुष्काळग्रस्तांपर्यंत पोहचवावे असा संकल्प प्रतिष्ठानमार्फत करण्यात आला होता. कोथरूडस्थित रहिवाशांनी केलेल्या सहकार्यामुळे बघता-बघता ६० हजार किलो धान्य गोळा झाले. हे सगळे धान्य बीड जिल्ह्य़ातील काही दुष्काळी भागामध्ये दोन्ही प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी स्वत: जाऊन वितरित केले. हिंदूू गर्जना प्रतिष्ठानचे अध्यक्ष धीरज घाटे, श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठानचे प्रमुख सुशील मेंगडे, माजी नगरसेवक शिवराम मेंगडे, चंद्रशेखर महाजनी, हेमंत बोरकर, जयराम देसाई आणि कर्वेनगरच्या स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाचे काशिनाथ देवस्थळी व पांडुरंग रामेकर या सर्वानी पंधरा दिवस सकाळपासून रात्री दहा वाजेपर्यंत कोथरूड परिसरातील रहिवाशांना दारोदार फिरून पत्रके वाटली व त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘जनसेवा बँके’ कडून गाव दत्तक
दुष्काळग्रस्तांच्या मदतीचे महत्त्व ओळखून जनसेवा बँकेने पुरंदर तालुक्यातील एखतपूर-मुंजवडी हे गाव दत्तक घेतले आहे. गेल्या एक महिन्यापासून या गावाला दररोज बारा हजार लीटर पाण्याचा टँकर बँकेमार्फत पाठवण्यात येत आहे. सासवडपासून नऊ किलोमीटरवरील बाराशे लोकसंख्या असलेले हे गाव बँकेने दत्तक घेतल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अॅड. सतीश गोरडे यांनी दिली. पावसाळा सुरू होईपर्यंत गावाला पाणीपुरठा केला जाणार आहे. नंतरही कायमस्वरूपी पाणी देण्याचा प्रयत्न बँक करणार आहे. आरोग्य, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांसह वृक्षलागवड आणि ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या योजनांवरही भर दिला जाईल, असे ते म्हणाले. बँकेतर्फे गावात आयोजित कार्यक्रमात अॅड. गोरडे यांच्यासह बाळासाहेब कचरे, डॉ. आशा बहिरट, अनुपमा कळसकर, हेमंत हरहरे, अप्पासाहेब पुरंदरे, शिवाजी भोसले, दत्ता झुरंगे, नंदकुमार दिवसे, अमोल बनकर, महादेव टिळेकर, मुरलीधर झुरंगे, विजय झुरंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
गोपाळ तिवारी मित्रमंडळाकडून २ लाखांची मदत
अखिल भारतीय काँग्रेस समिती सदस्य गोपाळ तिवारी आणि मित्र परिवारातर्फे राज्यातील दुष्काळग्रस्त बांधवांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दोन लाख १०१ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. विधान भवनातील मुख्यमंत्री दालनात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा निधी २५ जणांना धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आला. तसेच दुष्काळग्रस्त मदतनिधीचा दुसरा टप्पादेखील लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे गोपाळ तिवारी यांनी सांगितले. राजीव जगताप, मिलिंद जोशी, भोला वांजळे, नितीन पायगुडे, मिलिंद केळकर, राजेश धूत, मधू भिडे, अविनाश आळेकर, महेश अंबिके, विवेक भरगुडे, शंकर शिर्के, रामदास शेट्टी, अशोक काळे याप्रसंगी उपस्थित होते.
‘संकल्प’ ने पूर्ण केला धान्यदानाचा संकल्प!
दुष्काळग्रस्तांना ६० हजार किलो धान्यवाटप करण्याचा उपक्रम ‘श्री संकल्प सामाजिक प्रतिष्ठान’ तर्फे नुकताच राबविण्यात आला. शहरातील कोथरूड परिसरातील दानशूरांनी दिलेल्या मदतीच्या हातामुळे प्रतिष्ठानच्या संकल्पापेक्षाही अधिक धान्य बीड जिल्ह्य़ामधील दुष्काळग्रस्तांना वाटण्यात आले.
First published on: 07-04-2013 at 01:40 IST
TOPICSरेशन
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sankalp has fulfilled determination of supply of ration