श्रीराम ओक  shriram.oak@expressindia.com

बालमनावर संस्कृत भाषेचे संस्कार व्हावेत या हेतूने सुरू करण्यात आलेली ‘संस्कृत भाषा संस्था’.  कै. ग. वा. करंदीरकर यांनी या संस्थेची स्थापना केली. संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसाराबरोबरच शाळाशाळांमधून प्रत्यक्ष संस्कृत शिकविण्याचे कार्य संस्था करते आहे. ज्या प्रशिक्षणाद्वारे कोणत्याही ताणाशिवाय विद्यार्थी संस्कृत भाषेचा आनंदाने अभ्यास करीत आहेत.

‘देवभाषा’, ‘गीर्वाणभारती’, ‘देववाणी’ अशी विविध नामबिरुदे मिरवीत मानाचे स्थान मिळवणारी एकमेव भाषा म्हणजे प्राचीनतम अशी ‘संस्कृतभाषा’. भारतीय भाषांची जननी म्हणून संस्कृतची ओळख असून ही अत्यंत वैभवशाली, तर्कशुद्ध आणि बहुप्रसवा भाषा आहे. या भाषेची व्याकरणाच्या नियमांची चौकट अत्यंत भक्कम. तर्कशुद्धता प्राप्त झालेली ही भाषा बालवयापासून मुलांना शिकता यावी म्हणून ‘संस्कृत भाषा संस्था’ कार्यरत आहे.

बालवयापासून संस्कृतचा परिचय व्हावा, तसेच संस्कृतचे संस्कार सुलभतया आणि हसतखेळत व्हावेत, यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. यासाठी सुंदर, आकर्षक, मोठा टाईप असलेली, रंगीत सचित्र पुस्तके श्री. करंदीकर यांनी तयार केली. या पुस्तकांच्या आधारे पाचवी ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांना ‘सुसंस्कृत’ केले जाते आणि सातवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी जानेवारी महिन्यात संस्थेची स्पर्धा-परीक्षा घेण्यात येते. संस्कृत शिकणारे विद्यार्थी संस्थेला शाळांमधून मिळतात. शाळेच्या तासिकांमधल्या आठवडय़ातून दोन तासिका प्रत्येक तुकडीस (पाचवी ते सातवी इयत्तेतील) शिकवले जाते. संस्थेने तयार केलेली अत्यल्प शुल्क असलेली पुस्तके विकत घेऊन मुले त्याद्वारे अभ्यास करतात. शाळेतील विद्यार्थ्यांना या पुस्तकांच्या बरोबरीने तज्ज्ञ शिक्षकांची जोड मिळते, त्याद्वारे उच्चारणतंत्र शिकण्यास सोपे होते. संस्थेमार्फत ‘शिक्षक-प्रशिक्षक कार्यशाळेचे’ आयोजन करून चांगल्या शिक्षिका तयार केल्या जातात. अशा दहा-पंधरा शिक्षिका विविध शाळांमधे जाऊन अध्यापनाचे कार्य तळमळीने करतात. या मुलांच्या वेळोवेळी तोंडी-लेखी चाचण्याही घेतल्या जातात. हे कार्य चालते ते शाळांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि इतर शिक्षकवर्गाच्या सहकार्याने. या वर्षी डी.ई.एस. इंग्रजी माध्यम, गोळवलकर विद्यालय, एन.ई.एम.एस. शाळा, सेवासदन शाळा (इंग्रजी माध्यम) आदी शाळांमधील विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवणे सुरू आहे. अर्थातच या परीक्षांसाठी इतर मुले, प्रौढही बसूच शकतात.

या संस्थेच्या पुणे शाखेच्या संचालिका म्हणून विनोदिनी जोशी कार्यरत असून मधुरा गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संस्था स्थापन झाली.  जेव्हा हा उपक्रम सुरू झाला, तेव्हा या अभ्यासासाठी इच्छुक अशी साठ मुले त्यांना मिळाली होती आणि ती संख्या वाढत जाऊ न चारशेहून अधिक झाली आहे. सुरुवातीला त्यांनी दिलेल्या निवेदनामुळे जयश्री गोडसे, मधुरा गोखले, अमृता लेले, बोंद्रे दाम्पत्य ही सारी मंडळी संस्थेची पुण्यात उभारणी झाली, तेव्हापासून विनोदिनी यांच्याबरोबर कार्यरत आहेत. सुरुवातीच्या काळात शिक्षक तयार करण्यासाठी कार्यशाळा देखील घेतल्या गेल्या. या सगळ्या मार्गदर्शक चमूमध्ये आयुर्वेदिक डॉक्टरांसह संस्कृत तसेच मराठीमध्ये एम. ए. झालेली मंडळी कार्यरत आहेत.  संस्थेने ‘संस्कृतवाचनमाला’ असा चार भागांचा संच तयार केला असून त्यात रंगीत चित्रांद्वारे वर्णमालेचा परिचय, प्रार्थना, सुभाषितमाला, गीते, कथा यांचा समावेश आहे. तसेच भगवद्गीतेतील काही श्लोकही आहेत. दुसऱ्या पुस्तकापासून पाठाखाली अभ्यासार्थीसाठी स्वाध्याय दिला जातो. या संचाद्वारे मजेत अभ्यास करता येतो. ‘संस्कृत भाषा दर्पण’ हा दोन पुस्तकांचा संच तयार केला असून यात मुलांचा शब्दसंग्रह वाढविणारा भाग आहे. यात कोणत्याही चित्रांचा समावेश नसून तिसरे पुस्तक आहे ‘प्रश्नोत्तर-संङ्ग्रह’ . हे पुस्तक लेखी परीक्षेच्या सरावासाठी उपयुक्त आहे. स्पर्धा परीक्षेत शंभर-शंभर गुणांच्या दोन प्रश्नपत्रिका आणि पन्नास गुणांची मौखिक परीक्षा अशी एकूण दोनशेपन्नास गुणांची परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा ही ‘ऑब्जेक्टिव्ह’ पद्धतीची जरी असली, तरी शुद्धलेखन बघितले जाते. अशा प्रकारे सात पुस्तकांचा अत्यल्प किमतीतील संच अभ्यासार्थीना उपयुक्त ठरतो. अगदी शिशुगटातील विद्यार्थ्यांना देखील मागच्या वर्षी संस्थेने मार्गदर्शन केले होते. संवादाचा प्रभावी वापर करीत, काही क्लृप्त्यांद्वारे छोटय़ा आणि मोठय़ा गटाला शिकवले जाते. परिचय करून देण्याबरोबरच छोटे-छोटे प्रश्न संस्कृतमध्ये विचारण्यासारख्या गोष्टींमधून मुलांना संस्कृतबद्दल प्रेम निर्माण केले जाते. काही मुले धिटाईने संस्कृतमधून गोष्टही सांगतात.

पुण्याजवळील तळेगाव येथेही या अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात येते, शाळेच्या शिवायही वैयक्तिक पातळीवरील संस्कार वर्ग, बालभवने किंवा खासगी क्लासेसमध्ये योग्य ती विद्यार्थिसंख्या संस्था निर्माण करू शकत असेल, तर तेथेही संस्कृत मार्गदर्शनाला सुरुवात करण्याचा या मंडळींचा मानस आहे.   या संस्थेची अधिक माहिती हवी असेल किंवा या उपR माचा लाभ करून घ्यायचा असेल, संस्था-शाळांमधील मुलांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याची तुमची इच्छा असल्यास तुम्ही शीतल गोखले यांच्याशी ७७२००४६२२० किंवा जयश्री गोडसे यांच्याशी ८४८४९८०८२८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता. संस्थेच्या या परीक्षा उपक्रमामुळे संस्कृतभाषेच्या शुद्ध उच्चारण व शुद्धलेखन या पायाभूत बाबींची ओळख मुलांना बालवयातच होते. अशा रीतीने आपल्या प्राचीनतम, वैभवसंपन्न अशा भारतीय संस्कृतीचा परिचय संस्कृत भाषेद्वारे नव्या पिढीला करून देणे, त्यांच्यात राष्ट्राभिमान जागृत करण्याचे कार्य ‘संस्कृत भाषा संस्था ’ करीत आहे. संस्थेचे पुण्यात कार्यालय नसून संस्थेचे पदाधिकारी त्यांच्या घरातूनच संस्थेचे कार्य अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात आणि जबाबदारीपूर्वक पूर्णत्वास नेतात हे महत्त्वाचे.

Story img Loader