विद्याधर कुलकर्णी
पुणे : स्पॅनिश लेखक मिग्याल दे सव्र्हातेस यांच्या ‘डॉन किहोटे’ या जगप्रसिद्ध कादंबरीचा सुमारे नव्वद वर्षांपूर्वी दोन काश्मिरी पंडितांनी संस्कृत भाषेत केलेला अनुवाद पहिल्यांदाच प्रकाशित झाला आहे. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली आणि बौद्धविद्या विभागाच्या पुणे इंडॉलॉजिकल सीरिज या ग्रंथमालेत या अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले.
या अनुवादाची कहाणी एखाद्या चित्रपटाचे कथानक म्हणून शोभेल अशी रंजक आहे. डॉन किहोटे कादंबरीचा संस्कृत भाषेत अनुवाद करून घेण्याचे श्रेय दोन परदेशी व्यक्तींना जाते. कार्ल टिंडेन केलर या अमेरिकन उद्योगपतीला विविध पुस्तके जमा करण्याचा छंद होता. डॉन किहोटे या कादंबरीचे विविध भाषांमधील अनुवादही त्याने संकलित केले होते. या कादंबरीचा भारतीय भाषेत अनुवाद व्हावा यासाठी त्याने भारतविद्येचे अभ्यासक सर मार्क ऑरेल स्टाइन यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी नित्यानंद शास्त्री आणि जगद्धर झाडू या दोन काश्मिरी पंडितांना अनुवाद करण्यासाठी नियुक्त केले. त्यांनी त्या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादावरून तिचा संस्कृत भाषेत अनुवाद १९३५ च्या सुमारास केला होता, अशी माहिती सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली आणि बौद्धविद्या विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांनी दिली.
काश्मिरी पंडितांनी केलेला हा अनुवाद केलर यांच्या ग्रंथसंग्रहाबरोबर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात गेला आणि तेथेच आजतागायत पडून होता. जर्मनीतील प्राच्यविद्येचे अभ्यासक डॉ. द्रागोमिर दिमित्रोव्ह यांनी हा अनुवाद मिळवून त्यास आधारभूत असलेल्या इंग्रजी अनुवादासह प्रकाशित करण्याचे कार्य हाती घेतले. सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या पाली आणि बौद्धविद्या विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून ते आले असता त्यांनी याबद्दलची माहिती विभागप्रमुख प्रा. महेश देवकर यांना दिली. त्यांनीही या आगळय़ा-वेगळय़ा ग्रंथाचे महत्त्व जाणून तो विभागातर्फे प्रसिद्ध केला.
या संस्कृत अनुवादाचे ध्वनिमुद्रण भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतील संस्कृत अभ्यासक डॉ. श्रीकांत बहुलकर यांच्या आवाजात करण्यात आले असून ते या पुस्तकाबरोबरच उपलब्ध करून देण्यात आले आहे. या संस्कृत अनुवादाचे औपचारिक प्रकाशन दिल्ली येथील स्पेनच्या दूतावासात करण्यात आले. या कार्यक्रमास स्पेनचे भारतातील राजदूत ओसे मारिओ रिडाओ, सव्र्हातेस इन्स्टिटय़ूटच्या जगातील सर्व शाखांचे प्रधान संचालक लुई गार्सिआ मोन्तेरो, संचालक ओस्कार पुजोल रिम्बो, नित्यानंद शास्त्री यांचे नातू सुरिंदर नाथ पंडित, प्रा. महेश देवकर आणि डॉ. लता देवकर उपस्थित होते. अनुवादाचे संपादक डॉ. द्रागोमिर यांनी आभासी पद्धतीने जर्मनीहून भाग घेतला. डॉ. करण सिंग यांनी श्रीनगरहून आपले मनोगत व्यक्त करणारा संदेश पाठविला.
‘डॉन किहोटे’ ही जगातली अशी पहिली कादंबरी आहे, जिचा अनुवाद जगातल्या अनेक भाषांमध्ये झाला आहे. आता ही कादंबरी जगातील प्राचीन भाषा संस्कृतमध्ये आली आहे.
– ओस्कार पुजोल रिम्बो, संचालक, सव्र्हातेस इन्स्टिटय़ूट