प्रकाश खाडे,जेजुरी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आज पहाटे ज्ञानेश्वर माऊलींची महापूजा झाल्यानंतर जेजुरीतुन पालखी सोहळ्याने सकाळी सहा वाजता वाल्हे गावाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. परंपरेप्रमाणे आठ वाजता दौंडज खिंडीमध्ये पालखी सोहळा न्याहरीसाठी थांबला.या ठिकाणी सध्या रस्तारुंदीकरणाचे काम सुरु असल्याने वारकर्‍यांची न्याहरीसाठी बसण्याची गैरसोय झाली. दरवर्षी हिरवाईने नटणारा दौंडज खिंडीच्या डोंगरातील सारा परिसर पावसाअभावी उजाड आहे. जिथे शक्य होईल तेथे बसून आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांनी आणलेल्या मटकीची उसळ-भाकरी,पिठले,चिवडा,भेळ,शंकरपाळी आदी पदार्थ खाऊन वारकर्‍यांनी न्याहरी उरकली.

टाळ मृदुंगाच्या तालावर विठूनामाचा गजर करीत पालखी सोहळा सकाळी साडेअकरा वाजता रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत पोहचला.यावेळी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे,सरपंच अमोल खवले,भाजपचे सचिन लंबाते यांनी पालखीचे स्वागत केले.दुपारी एक वाजता वाल्हे येथील पालखी तळावर सोहळा पोहचला.तेथे समाजाअरती झाली.श्री ज्ञानेश्‍वर माऊलींचा पालखी सोहळा रविवारी (दि.१८) सकाळी सहा वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार आहे.नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना विधीपुर्वक स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.

वारीत नेत्यांची उपस्थितीविरोधी पक्षांनी माऊलींच्या वारीत राजकारण करु नये : विनोद तावडे

वारकरी संप्रदाय हा विश्वाचे कल्याण चिंतणारा आहे.आम्हाला राजकारणासाठी अकरा महिने पडलेले आहेत.आषाढी वारीचा महिना संपूर्ण विश्वासाठी शांती,समता व बंधूत्वाची शिकवण देणारा महिना म्हणून याकडे पाहिले जाते.त्यामुळे किमान या महिन्यात तरी विरोधी पक्षांनी वारीसंदर्भात राजकारण करू नये असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी केले.आळंदीत प्रस्थान सोहळ्याच्या वेळी वारकरी विद्यार्थी व पोलिसात झालेली झटापट व त्याचे विरोधी पक्षाने केलेले भांडवल याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.आळंदी संस्थानने याबाबत वस्तुस्थिती मांडली असल्याचे त्यांनी सांगितले.गेली अनेक वर्षे मी सपत्नीक वारीत सहभागी होतो असे ते म्हणाले.

आ.वर्षा गायकवाड वारीत सहभागी

काँग्रेसच्या मुंबई शहराध्यक्षा आ.वर्षा गायकवाड यांनीही जेजुरी ते वाल्हे हे बारा किलोमीटरचे अंतर वारकऱ्यांसमवेत पार केले.वारीत चालणारी ही आमची तिसरी पिढी असल्याचे त्या म्हणाल्या.आता मी वारीचा एक टप्पा पूर्ण केला आहे.वारीत चालण्याचा आनंदच वेगळा आहे.वारी ही समतेची वारी आहे.येथे जात,धर्म,पंथ विसरुन वारकरी सहभागी होतात असे त्या म्हणाल्या.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sant dnyashwar maharaj wari in walhe today scj