संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालखी मार्गाचे सद्यस्थितीला ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. मी या कामाबाबत समाधानी असून, हीच कामाची गती लक्षात घेता डिसेंबर अखेरपर्यंत काम पूर्ण होईल आणि नवीन वर्षात पालखी मार्गाचे उद्घाटन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नितीन गडकरी म्हणाले की, देहू आणि आळंदी या ठिकाणाहून अनवाणी अनेक लोक पायी पंढरपूरला जातात. या नागरिकांच्या दृष्टीने पालखी मार्ग विस्तार करण्याचे ठरविले आणि ते लवकरच पूर्ण होणार आहे. त्या गोष्टीचा मला आनंद आहे. राज्य सरकारने एकूण २४ पालखी स्थळाच्या ठिकाणी १० हजार नागरिकांची व्यवस्था होईल अशा स्वरुपाचा हॉल बांधवा. इतर वेळी तो हॉल लग्न कार्यासाठी उपलब्ध करून द्यावा. त्यातून मेंटेनन्स मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे : शाळेच्या आवारात मुलीशी अश्लील कृत्य; अनोळखी तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
आज पालखी मार्गाची हवाई पाहणी केली. त्यावेळी उजनी धरणाची पाहणी केली. त्या धरणातील गाळ महामार्गाच्या कामासाठी उपलब्ध झाल्यास कामाचा अधिक दर्जा प्राप्त होईल आणि धरणाचे खोलीकरणदेखील होईल. त्यामुळे भविष्यात पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. हे लक्षात घेऊन उजनी धरणातील गाळ मिळवा, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे गडकरींनी सांगितले.
चांदणी चौकातील ब्रिजचे उद्घाटन 1 मे रोजी
चांदणी चौकातील ब्रिज पाडून काही महिने झाले आहे. तेथील काम पूर्णत्वाकडे गेले आहे. आता 1 मे महाराष्ट्र दिनी चांदणी चौक ब्रिजचे उद्घाटन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजन असून वेळ घेऊन करणार असल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले.
हवेतील बसच्या प्रश्नावर नितीन गडकरी म्हणाले, मी घोषणा…
पुण्यातील एका कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी घोषणा केली होती की, पुणेकर नागरिकांना लवकरच हवेतील बसने प्रवास करता येणार. त्याचे पुढे काय झाले या वर नितीन गडकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी घोषणा करणार्यांपैकी नाही. कोणती घोषणा केली आणि ती पूर्ण केली नाही, ते सांगा. तसेच हवेतील बससाठी पुणे महापालिकेने डीपीआर द्यावा, अशी भूमिका गडकरी यांनी मांडली.