आठ महिन्यानंतर महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळांसह देहू येथील संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे मंदिर देखील खुले करण्यात आले आहे. परंतु, सध्या करोना वाढत्या रुग्णसंख्येमुळे पंढरपूरमध्ये होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराजांचे मंदिर तीन दिवस बंद ठेवण्याच्या निर्णय देहू संस्थाननं घेतला आहे. भाविकांनी देहूमध्ये गर्दी करू नये, असं आवाहन संस्थानाकडून करण्यात आलं आहे. पंढरपूरमध्ये कार्तिकी एकादशीच्या काळात संचारबंदी लागू केली जाणार आहे.
मार्च महिन्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे बंद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. मात्र, ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रातील करोना बाधित रुग्णांचा आकडा काही प्रमाणात कमी झाल्यानंतर प्रार्थनास्थळे सुरू करण्याची मागणी सुरू झाली. विरोधक देखील मंदिर सुरू करण्याच्या भूमिकेवर आग्रही होते. भाविकांची देखील मंदिर खुली करावीत, अशी मागणी होती. मागणीचा विचार करत ठाकरे सरकारनं प्रार्थनास्थळे खुली करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रातील मुख्य मंदिरांसह इतर मंदिरं खुली झाली आहेत. प्रार्थनास्थळे नुकतीच खुली झालेली असताना करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्यातही करोनाचे रुग्ण वाढत असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये वारकरी आणि भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन देहू येथील जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर २५ ते २७ नोव्हेबर दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. देहू संस्थानाचे विश्वस्त संजय मोरे यांनी ही माहिती दिली आहे. या दरम्यान, मंदिरातील नित्य कार्यक्रम महापूजा, कीर्तन इत्यादी संस्थानंच्या वतीने होणार आहेत.